Sun, May 26, 2019 18:56होमपेज › Nashik › शिवसेना उमेदवार दराडेंच्या अर्जावर आक्षेप

शिवसेना उमेदवार दराडेंच्या अर्जावर आक्षेप

Published On: May 05 2018 12:51AM | Last Updated: May 04 2018 11:35PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या  अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी आक्षेप घेतला असून, या मुद्यावर निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी मागविले. ते रात्री उशिरापर्यंत आले नसल्याने मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे.दराडे यांचा अर्ज बाद ठरल्यास या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होेऊन अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि परवेझ कोकणी यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान दराडे यांच्या अर्जास आक्षेप घेण्यावरुन दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन तणाव वाढल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप झाले होते.

उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. त्यावेळी सहाणे यांनी दराडे यांच्यासंदर्भात अनेक हरकती नोंदविल्या. दराडे यांच्या पत्नीच्या नावे येवला नगर परिषदेची एक लाख 40 हजार रूपये थकबाकी असल्याची पहिली हरकत होती. त्यावर तात्काळ ही रक्कम भरण्यात आल्याने ती निकाली काढण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर अर्जामध्ये सहाणे यांनी दुसरी हरकत घेतली. कुटुंबात अवलंबून असणारे सदस्य नेमके किती ह्या रकान्याचा त्यात समावेश होता.यावर दराडे यांनी आपल्यावर कोणीही अवलंबून नसल्याचे  सांगितले. पण, रकान्यात तसे निरंक लिहिणे आवश्यक होते, असे सहाणे यांनी मांडले. यावेळी पेच निर्माण झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले.

दरम्यान, सुनावणी जिल्हाधिकार्‍यांकडे  सुरू असताना समर्थकांना आत प्रवेश नाकारण्यात आला. मात्र यावेळी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांना प्रवेश देण्यात आल्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला.  यावरून दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीसुरु होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले.  त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पोलिसांची जादा कुमक मागवून घेत सर्वांनाच दालनाबाहेर काढले. दुसरीकडे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी आमदार दिलीप बनकर,आमदार अपूर्व हिरे, अद्वय हिरे आदी प्रक्रिया संपेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. दराडे यांच्यावतीने अ‍ॅड. जालिंदर ताडगे, सहाणे यांच्यावतीने अ‍ॅड. के. के. वाडेकर, किशोर दराडे यांच्यावतीने ए. एस. जगताप यांनी बाजू मांडली.

Tags : Nashik, Opposition, Shiv Sena, candidates, application