Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Nashik › जलयुक्तच्या अवघ्या 124 कामांना प्रारंभ ; यंत्रणांची चालढकल

जलयुक्तच्या अवघ्या 124 कामांना प्रारंभ ; यंत्रणांची चालढकल

Published On: Dec 02 2017 4:30PM | Last Updated: Dec 02 2017 4:28PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या दोन  वर्षात झालेल्या कामांमुळे पाणी साठवणुक क्षमतेत वाढ होऊन जिल्ह्याला नवसंजीवनी मिळाली आहे. दोन वर्षातील योजनेची यशस्वीता बघता सलग तिसर्‍या वर्षीही योजनेतील कामांना गती मिळणे अपेक्षित होते. परंतु, यंत्रणांच्या चलाढकलमुळे सद्यस्थितीत केवळ 124 कामेच सुरू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

जिल्ह्यात चालू वर्षी जलयुक्त शिवारसाठी दोनशे गावांची निवड झाली असून एकुण 4 हजार 439 कामांचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात यातील 50 टक्के कामांना तांत्रिक मंजूरी देत ती सुरू होणे अपेक्षित होते. त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी देखील वारंवार यंत्रणांना सुचना दिल्या होत्या. मात्र, अधिकार्‍यांमधील लालफितीचा कारभारात संबंधित कामे अडकल्याने आत्तापर्यंत केवळ 124 कामांचाच शुभारंभ झाला आहे. तालुकास्तरावर अनेक प्रस्ताव प्रलंबीत असल्याची माहिती मिळते आहे. त्यातही मागील वर्षाची पाच ते दहा टक्के कामे अद्यापही अपुर्ण अवस्थेत आहेत. त्यामूळेच जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी ठरलेल्या योजनेचे भवितव्यच सध्या अंधारमय झाले आहे.  

गत आर्थिक वर्षात 219 गावांमध्ये 6 हजार 158 कामे हाती घेण्यात आली होती. त्यात नाला खोलीकरण व रूंदीकरण, विहिर पुर्नभरण, सिमेंन्ट बंधारे बांधणे अशा विविध कामांचा समावेश होता. ही कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करणे आवश्यक होते. मात्र, सरकारी यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे यातील 5 ते 10 टक्के कामे अद्यापही शिल्लक आहेत. सरकारने गतवर्षातील अपुर्ण कामे करण्यासाठी 31 मार्चची डेडलाईन दिली असून त्याचबरोबर चालूवर्षातील 50 टक्यांपेक्षा अधिक कामे पुर्ण होणे अपेक्षित आहेत. त्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथ्या योजनेत निवड झालेल्या गावांतील ग्रामस्थांना भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. 

डेटा एन्ट्री ऑपरेटर वार्‍यावर 

जलयुक्तची माहिती भरण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एका कंत्राटी कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली होती. या कर्मचार्‍यांची मुदत 31 ऑगस्टला संपुष्टात आली. त्यानंतर अद्यापपर्यंत कर्मचार्‍यांचा नविन करार करण्यात आला नाही. जिल्हाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या नेमणूकीबाबत प्रांतधिकार्‍यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र, हा जिल्हास्तरावरील विषय असल्याचे सांगत प्रांतांनी यातून अंग झटकले आहे. त्यामुळेच 15 कर्मचारी सध्या वार्‍यावर असून तालूकास्तरावरील डेटा एन्ट्रीचे कामे खोळंबली आहेत.