Thu, Apr 25, 2019 15:44होमपेज › Nashik › कांदा विक्रीतून मिळाले ६१ कोटी!

कांदा विक्रीतून मिळाले ६१ कोटी!

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:55PM

बुकमार्क करा
जळगाव बुद्रुक : संतोष कांदे

नांदगाव तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळला. पावसाअभावी कांद्याचे रोप विक्री करावे लागले, ज्यांच्याकडे थोडेबहुत पाणी उपलब्ध होते, त्या शेतकर्‍यांना मात्र मेहनत व चिकाटीच्या जोरावर अवघ्या तीन महिन्यांत कांदा शेतमालाच्या जोरावर सुमारे 60 कोटी 68 लाख 12 हजार 170 रुपये प्राप्त झाले आहेत. यात विशेष असे की, नांदगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या इतिहासात ही विक्रमी उलाढाल पहिलीच आहे.

ऑक्टोबर महिन्यात नांदगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये 47 हजार 261 क्‍विंटल कांदा विक्री करण्यात आला. या महिन्यात किमान-911, कमाल-2800, तर सरासरी-2200 रुपये प्रतिक्‍विंटल असे भाव कांदा पिकाला मिळाले. त्यातून शेतकर्‍यांना सुमारे नऊ कोटी पाच लाख 70 हजार 407 रुपये या एका महिन्यात प्राप्त झाले.

नोव्हेंबर महिन्यात कांदा बाजार 700 ते 800 रुपयांची भरघोस वाढ झाली आणि त्यामुळे कांदा काढणीस वेग येऊन या महिन्यात 66 हजार 776 क्‍विंटल कांदा विक्री झाला. या महिन्यात किमान-1000, कमाल-3852, तर सरासरी-2900 असे भाव मिळाले. या कांदा विक्रीतून सुमारे 17 कोटी 67 लाख 29 हजार 311 रुपयांची प्राप्ती तालुक्यातील शेतकर्‍यांना झाली.

तर डिसेंबर महिन्यात बाजारभावात प्रतिक्‍विंटल 50 रुपयांची घट झाली. मात्र, आवकेमध्ये प्रचंड वाढ झाली. या महिन्यात सुमारे एक लाख 26 हजार 176 क्‍विंटल कांदा आवक होऊन किमान-1000, कमाल-3511, तर सरासरी-2850 रुपये प्रतिक्‍विंटल असे भाव प्राप्त होऊन सुमारे 33 कोटी 95 लाख 12 हजार 452 अशी घसघशीत रक्‍कम शेतकर्‍यांच्या पदरात पडली आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात नांदगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये (तालुक्यातील मनमाड व बोलठाण बाजार उपसमिती वगळून) सुमारे दोन लाख 40 हजार 153 क्‍विंटल कांदा आवक झाली. या कांदा विक्रीतून 60 कोटी 68 लाख 12 हजार 170 रुपये शेतकर्‍यांना मिळून शेकडो शेतकरी ‘लखपती’ झाले आहेत.

दरम्यान, विद्यमान राज्य शासनाने आडत बंद करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला होता, त्याची प्रचिती या तीन महिन्यांत विक्री केलेल्या कांद्यावरून आली आहे. आडत बंद झाल्याने शेतकर्‍यांचे सुमारे दोन कोटी 42 लाख 72 हजार 486 रुपये वाचले आहेत. आडत सुरू असती तर ही रक्‍कम त्या-त्या व्यापार्‍यांना मिळाली असती!