होमपेज › Nashik › परराज्यात आवक वाढल्याने कांदा घसरला

परराज्यात आवक वाढल्याने कांदा घसरला

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 26 2018 11:29PMनाशिक : टीम पुढारी

कांदा दरात घसरणीचे सत्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुरु झाले आहे. पिंपळगाव, उमराणे, लासलगाव, सायखेडा, येवला, वणी, निफाड बाजार समिती, उपबाजार आवारात कांद्याची आवक वाढली आहे. त्याचबरोबर परराज्यातील कांद्याची आवकही त्या-त्या बाजार समित्यांमध्ये होत असल्याने नाशिकच्या कांद्याचे मार्केट हिरावले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. कांदा उत्पादक धास्तावले आहे.

लासलगावला मोठी घसरण

परराज्यांमध्ये कांद्याची मोठी आवक वाढल्याने नाशिकच्या बाजारपेठतून जाणार्‍या कांदा निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामूळे कांदा दर घसरण्यास  सुरवात झाली आहे.लासलगाव बाजार समितीत शनिवार रविवारच्या दोन दिवस सुट्टीनंतर सोमवारी जो कांदा विक्रीला आला. त्या कांद्याच्या दरात सुमारे  पुन्हा 400 रुपयांची घसरण झाली. 5 फेब्रुवारीच्या तुलनेत कांदा दरात 1300 रुपयांची घसरण झालेली आहे. कांद्याचे दर 1500 रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेतचे वातावरण आहे. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. लाल कांद्याची सुरु असलेली विक्रमी आवक त्यात या हंगामात उन्हाळा कांद्याचे आगमन झाले आहे. निर्यातमूल्य शून्य केल्यानंतरही येथील लिलावात शुक्रवारच्या तुलनेत सकाळ सत्रात लिलाव सुरू होताच 350 रूपयांची वेगाने घसरण झाली आहे.

येवल्यात 400 रुपयांची घसरण

येवल्यातून बांगला देशातून निर्यात होणार्‍या कांद्याची मागणी घटली असून, पुणे परिसरातही कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामूळे या बाजार समितीतून कांदा  दर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.26) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुमारे 400 रुपयांची प्रति क्विंटलमागे घसरण दिसून आली.  शुक्रवारी जो कांदा 1400 रुपये क्विंटलने विकला, तोच कांदा सोमवारी 1100 रुपयांच्या आत विकावा लागला.

समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 250 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. नांदगाव कृषी उत्पन्‍न समितीच्या संचालक मंडळाने बाजारसमिती आवारातील भुईकाटा चालू करण्याचा घेतलेला निर्णय व्यापार्‍यांना मान्य नसल्याने त्यांनी लिलाव बंद पुकारला आहे. लिलाव बंदमुळे  सकाळच्या सत्रात 250 कांदा वाहनाने आली ती तशीच होती. बंदमुळे बोलठाण उपबाजारात आलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक पडून होती. बाणगाव, माणिकपुंज, कसाब खेड, पोही या गावातील कांदा आवक झालेली होती.