Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Nashik › कांदा निर्यातीत ५० टक्क्यांनी घट!

कांदा निर्यातीत ५० टक्क्यांनी घट!

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:25PM

बुकमार्क करा
लासलगाव : वार्ताहर

देशात भडकलेल्या कांद्याच्या किमतीचे नियंत्रण तसेच बाजारातील पुरवठ्याचे प्रमाण सुधारण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य दर 850 डॉलर केल्याच्या निर्णयानंतर कांदा निर्यातीत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 5 लाख 70 हजार 876 टन कांदा हा निर्यात झाला होता. मात्र, 2017 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 2 लाख 93 हजार 119 टन एवढा कांदा निर्यात झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे दर स्थिर राहावे यासाठी यांनी किमान  निर्यात मूल्य दरामध्ये वाढ केली. आपल्या देशाच्या तुलनेने स्पर्धक देशांचे किमान  निर्यात मूल्य दर हे कमी असल्याने त्यांच्या कांद्याला जास्त मागणी वाढत आहे. आपली हक्काची असलेली बाजारपेठ हे दुसरे देश काबीज करीत आहे. या सर्व गोष्टीला केंद्र सरकारचे धोरण जबाबरदार आहे असे मत लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी व्यक्‍त केले आहे.

गेल्या 4-5 दिवसांपासून कांदा बाजारभावात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याचे दर स्थिर ठेवणेसाठी केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे, असेही यावेळी होळकर यांनी म्हटले आहे.

शहरातील ग्राहकांना कमी दरात कांदा मिळण्यासाठी केंद्राने निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पाच दिवसात 850 रुपयांनी भाव घसरले. कांदा शेती वाचविण्यासाठी शासनाने कांदा निर्यात मूल्य दर कमी करून निर्यातीला गती द्यावी, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे, असे शेखर कदम या शेतकर्‍याने मत व्यक्त करताना सांगितले.