Wed, Apr 24, 2019 08:03होमपेज › Nashik › कांदा दरातील घसरण सुरुच!

कांदा दरातील घसरण सुरुच!

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:32PMलासलगाव : वार्ताहर

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये पुन्हा 300 रुपयांची घसरण दिसून आली. दोन दिवसांमध्ये कांदा दरात 1200 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

लासलगाव बाजार समिती सूत्राकडून मिळालेल्या महितीनुसार बुधवारी (दि.31)  लाल कांद्याला सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. मोठ्या प्रमाणात नवीन कांदा हा गुजरात, मध्य प्रदेश इतर राज्यातील बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने आवकेमध्ये वाढ झाली आहे.देशात मागणीच्या तुलनेने पुरवठा वाढला आहे तर दुसरीकडे कांद्यावरील निर्यात मूल्य दर हे 700 डॉलर असल्याने देशातील निर्यातीला फटका बसला आहे. याच कारणामुळे कांदा दरात मोठी घसरण सुरु आहे आणि शेतकर्‍यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.

दोन वर्षानंतर कांद्याला समाधानकारक भाव मिळत होते. मात्र, शहरी भागात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलांडल्याने  सरकारने तत्काळ हस्तक्षेप करत निर्यात मूल्यात वाढ करून अघोषित निर्यातबंदी केल्याची ओरड शेतकर्‍यांकडून केली जात आहे. आता तरी शासनाने किमान निर्यात मूल्य दर 700 डॉलरवरुन शून्य करावे, अशी मागणी होत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 600 नगांची आवक होऊन लाल कांद्याला कमीत कमी 950 सरासरी 1650 तर जास्तीत जास्त 1905 भाव होते. आगामी काळात कांद्याचे भाव आणखी खाली येतील त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात मूल्य पुन्हा शून्यावर आणावे, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करीत आहे.

मनमाडला कांदा आवक वाढली

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या दोन दिवसात कांद्याच्या भावात क्विंटल मागे तब्बल 1300 रुपयांची घसरण झाली. सोमवारी कांद्याला सरासरी 2800 रुपये भाव मिळाला होता. बुधवारी कांद्याला 1500 रुपये भाव मिळाला. दोन दिवसात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यचे पाहून शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आवक जास्त तर मागणी कमी शिवाय निर्यात मूल्यदेखील जास्त असल्याने परदेशात कांदा पाठविला जात नाही. या सर्वांचा फटका कांद्याच्या भावाला बसत असून, आगामी काळात कांद्याची आवक आणखी वाढणार असल्याने भाव आणखी घसरण्याची दाट शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात मूल्य कमी करावे, अशी मागणी बळीराजाने केली आहे.

लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज 2 लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. तर पुणे व गुजरात राज्यातून कांद्याची मोठी आवक येत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. त्यामुळे निर्यात मूल्य दर हे कमी करून निर्यात कशी होईल, याकडे आता मुख्यतः केंद्र सरकारने लक्ष दिल्यास कांद्याचे दर स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते.
- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

दोन वर्षामध्ये कांदा हा 500 ते 600 रुपये तोट्यात विकला होता. मात्र, आता कुठे तरी चांगले भाव मिळत असताना केंद्र सरकारने अप्रत्यक्ष केलेली निर्यात बंदी ही आमच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे निर्यात मूल्य डॉलर हे 700 वरून कमी करून 0 डॉलर केल्यास शेतकर्‍यांना मोठी मदत होईल.
- नारायण पालवे, कांदा उत्पादक शेतकरी, वेळापूर