होमपेज › Nashik › तोफगोळ्याच्या स्फोटात एक ठार

तोफगोळ्याच्या स्फोटात एक ठार

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 11:16PMअस्वली स्टेशन : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्‍हे येथील गुलाबवाडीतील एका घरात बुधवारी (दि.22) दुपारी लष्करी हद्दीतून आणलेल्या तोफ गोळ्याची छेडछाड करताना झालेल्या भीषण स्फोटात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. अजय संजय शिरसाठ (21, बेलगाव कुर्‍हे) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

उत्तम भीमा मुठे त्याची पत्नी गायत्री उत्तम मुठे व आई फशाबाई भीमा मुठे हे एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या भयंकर स्फोटामुळे गावातील अनेक घरांना जोरदार हादरे बसले असून, अनेक घरांची कौले, पत्रे फुटले आहे. घरात झालेल्या स्फोटामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मात्र बेलगाव कुर्‍हेचे ग्रामस्थ अचानक झालेल्या या स्फोटामुळे भयभीत झाले आहेत. बेलगाव कुर्‍हे गावालगतच लष्कराची हद्द असून, तेथे सरावाचा पडलेला एखादा गोळा व इतर अनधिकृत दारुगोळा मयत व्यक्‍तीने आपल्या घरी आणल्यामुळेच हा स्फोट झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उत्तम मुठे यांच्या घरात अचानक मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला.

या स्फोटात मुठे यांच्या घराचे पत्रे हवेत उंच उडून आजूबाजूला पडले. त्यामुळे ग्रामस्थांची भंबेरी उडून घटनास्थळी सर्वांनी धाव घेतली. तेथे अजय शिरसाठ या युवकाने लष्करी हद्दीत जवानांनी सरावासाठी सोडलेल्या एखाद्या गोळ्याचा काही भाग घरी आणलेला होता. त्याच्याशी तो लोखंडी साहित्याच्या सहाय्याने तोडफोड करीत असताना त्यातील दारुगोळ्यांशी झालेल्या स्पर्शाने भीषण स्फोट होऊन त्यात अजय जागीच ठार झाला. छिन्‍न-विछिन्‍न अवस्थेत पडलेला त्याचा मृतदेह बघून ग्रामस्थ घाबरले होते. आणि गंभीर मुठे परिवार जीवाच्या आकांताने मदत मागत होता. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील केरु धोंगडे यांनी वाडीवर्‍हे पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, उपनिरीक्षक शांताराम देशमुख यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेलगाव कुर्‍हे गावालगत लष्कराची हद्द असून, या हद्दीत लष्कराचे सराव चालतात.

काही आदिवासी या सरावासाठी हद्दीत पडलेल्या गोळ्याचे साहित्य चोरून आपल्या घरी आणतात. यात असलेले तांबे, पितळ, शिसे आदी भंगारात विक्री करून उदरनिर्वाह करतात. या हद्दीत आतापर्यंत परिसरातील अनेक आदिवासी गोळ्याखाली येऊन गतप्राण झालेले आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बेलगाव कुर्‍हे येथे येऊन माहिती घेतली. नागरिकांनी हद्दीत जाऊ नये असे सांगितले. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकार्‍यांना पाचारण करून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंची तपासणी करण्यासाठी सर्व साहित्य व काही सुटे भाग पोलिसांनी जप्त केले आहे.