Thu, Jan 17, 2019 02:57होमपेज › Nashik › नाशिक : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या (Video)

नाशिक : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या (Video)

Published On: May 10 2018 1:09PM | Last Updated: May 10 2018 1:10PMनाशिकरोड : वार्ताहर 

भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. नाशिकरोड येथील वास्को चौकात पहाटे तीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान घटना घडली.  खुनाचे नेमके कारण समजले नसून पोलीस संशयित तिघांचा शोध घेत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (४१, रा रोकडोबावाडी , देवळाली गाव ) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . पत्नी आणि दोन मुले आहेत. काल (बुधवार दि.१०) मध्यरात्री नेहमी प्रमाणे बाळासाहेब भंगार गोळा करण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाळासाहेब यांना दगडाने बेदम मारहाण केली. मारहाणीचे कारण नेमके समजू शकले नाही. त्यांच्या तोंडामधुन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे त्यांना ओळखणारे संतोष कटारे (रा.  सिन्नरफाटा पोलीस चौकी मागे ) यांनी पाहिले. यावेळी  बाळासाहेब दोंदे यांनी कटारे यांना  भंडारी प्लाउड दुकाना समोर जाऊ नको , तिथे तीन व्यक्ती असून त्यांनीच मला दगडाने मारहाण केली आहे. असे सांगितले. त्यामुळे कटारे सुभाष रोड या भागाकडे निघून गेले. 

दरम्यान मयत बाळासाहेब दोंदे यांचे मोठे भाऊ अनिल आणि धनवंतर दोंदे यांचा महावीर बॅगच्या दुकानजवळ चहाचा हातगाडा आहे. दोघेही चेहडी परिसरात वास्तव्यास आहे. अनिल दोंदे यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी संशयित गुन्हेगारांचा शोध सुरू असून लवकरच गुन्हेगाराना अटक केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली.

Tags : Crime, Murder, Kill, Stone, Head, Nashik