Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Nashik › पुन्हा एकदा माझ्या हाती सत्ता द्या : राज ठाकरे

पुन्हा एकदा माझ्या हाती सत्ता द्या : राज ठाकरे

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:31AMनाशिक : प्रतिनिधी

शिवसेनेने ‘सत्तेला लाथ मारू’ या नाट्याचे जेवढे प्रयोग सादर केले नसतील त्याहून अधिक ‘माझ्या हाती सत्ता द्या’चे अंक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुखांनी बहुदा सादर केले असावेत. गर्दी पाहिली की राज ठाकरे हा डायलॉग फेकणारच, हे जणू समीकरणच बनले आहे. शेतकरी मोर्चाला संबोधित करताना मनसेप्रमुखांनी पुन्हा एकदा नेहमीचे तुणतुणे वाजविल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

ज्या नाशिककरांनी मनसेची हवा निर्माण केली त्यांनाच राज ठाकरे यांनी विश्रामगृहात सोफ्यावर बसून पोरगं व्हायलासुद्धा नऊ महिने लागतात, असे शहाणपण शिकविले. अर्थात, नाशिककरांनी धडा शिकविल्यानंतर राज ठाकरे विश्रामगृहात जमिनीवर बसले होते. नाशिकहून निघालेले शेतकरी मोर्चाचे ‘लाल वादळ’ मुंबईला पोहोचल्यावर राज ठाकरे यांनी शेतकर्‍यांची भेट घेतली. त्यांना संबोधित करताना ‘माझ्या हाती सत्ता द्या, मग पहा’ हा त्यांचा नेहमीचा डायलॉग मारायला ते अजिबात विसरले नाही.

मुळात राज ठाकरे यांना शेतकर्‍यांबद्दल किती कळवळा आहे, हे जगजाहीर आहे. शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केल्यानंतर पुणे येथील सभेत बोलताना शेतकर्‍यांच्या पोरांना मला जीन्स पॅन्ट, टी शर्ट घालून डोळ्यावर गॉगल लावून ट्रॅक्टर चालविताना पाहायचे आहे, असे स्वप्न त्यांनी रंगविले होते. मात्र, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची वेळ आली तेव्हा समर्थन देण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. 

‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल’ ही मनसेच्या आंदोलनाची स्टाइल. मात्र, शेतकर्‍यांच्या रास्त मागण्यांसाठी मनसेने कधी ‘खळळ...खट्याक्’ केल्याचे आठवत नाही. नाशिकमध्येही सत्तेचा सोपान चाखताना ‘राजगड’मध्ये एसीची हवा खात ठाकरे यांनी शेतकर्‍यांना उन्हामध्ये ताटकळत ठेवले होते. काही वेळानंतर शेतकर्‍यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही मला अहवाल सादर करा, बाकीचे मी बघतो, अशी ठाकरे शैलीत डरकाळी फोडली होती. नंतर मात्र, ही डरकाळी फुसकी निघाली, हे सर्व शेतकर्‍यांनी अनुभवले आहे. आता पुन्हा एकदा किसान सभेच्या लाल वादळाला संबोधित करताना ठाकरे यांनी नेहमीचे तुणतुणे वाजवले.

पक्षाचा एक आमदार तोही शिवसेनेच्या वाटेवर असे असताना मनसेचे इंजिन ‘एकदा माझ्या हाती सत्ता द्या, मग बघा’ या पलीकडे  धावत नाही, अशी गत पाहायला मिळत आहे हा सर्व प्रकार बघितल्यावर नशीब ‘कृष्णकुंज’वर भुजबळ समर्थकांची गर्दी पाहिल्यावर राज ठाकरे हे ‘माझ्या हाती सत्ता द्या, मग पाहा तुमच्या सर्व मागण्यांना कसा न्याय देतो’, असे काही  बोलले नाही, अशी खुमासदार चर्चा रंगली आहे.

 

Tags : nashik, nashik news, MNS, Raj Thackeray,