Sat, Mar 23, 2019 00:24होमपेज › Nashik › मालेगावी मुस्लिम समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

मालेगावी मुस्लिम समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 10 2018 12:58AMमालेगाव : प्रतिनिधी

आघाडी शासनाने मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण  विद्यमान शासनाने कायदेशीर चौकटीत बसवून लागू करावे, पिछाडीवर असलेल्या धनगर समाजालाही न्याय मिळावा, अशी मागणी करीत  मुस्लिम रिझर्व्हेशन फेडरेशनने दुपारी तीन वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर सवंदगाव फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक टप्प झाली होती.

मराठा आंदोलनानंतर मुस्लिम समाजाने महामार्गावर आंदोलन करीत आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले. या नियोजित आंदोलनाकडे महसूल व पोलीस प्रशासनाने धाव घेतली. यावेळी आमदार आसिफ शेख, महापौर शेख रशीद यांनी नेतृत्व केले. शासनाने 16 जुलै 2014 मध्ये मराठा समाजाला 16 टक्के, तर मुस्लिम समाजातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेल्या 50 पोटजातींना शैक्षणिक व नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयाविरोधात जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. मराठा समाजाचे आरक्षण रद्द करून न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण कायम ठेवले होते. त्याप्रमाणे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले नाही. त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, त्याचा लाभ समाजाला मिळू शकलेला नाही. भाजपा सरकारचा दुटप्पीपणा कारणीभूत असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला. 

मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले. त्याची दखल न घेतल्याने आंदोलन चिघळले. तेव्हा कुठे शासनाने आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन बोलावून निर्णय जाहीर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दादेखील निकाली काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुस्लिम समाजाला धर्माच्या नव्हे, तर त्यातील 50 मागास पोटजातींना आरक्षणाचा लाभ दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यात तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रांत अजय मोरे व तहसीलदार देवरे यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी खालीद मोईन कुरैशी, सिद्दीकी हम्याद, फैसल नफिस, इम्तियाज अन्सारी, नजमुल  गफ्फार, अब्दुल्लाह सिद्दिकी आदी उपस्थित होते.