Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Nashik › अशा या दाट ‘लगीनघाईत’ कार्यालयात कुणीही नाहीत

अशा या दाट ‘लगीनघाईत’ कार्यालयात कुणीही नाहीत

Published On: May 05 2018 10:49AM | Last Updated: May 05 2018 10:38AMत्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

सध्या दाट लग्नतिथी असल्याने अनेक कार्यालयांमधील कर्मचारी अन् अधिकारी आप्तेष्टांच्या मंगलकार्यात हजेरी लावण्यासाठी जात आहेत.  मात्र, कामे करून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना  गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांमुळे ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीचा प्रत्यय घ्यावा लागत आहे. असेच काहीसे चित्र शुक्रवारी (दि. 4) येथील नगरपालिकेत दिसून आले. त्यामुळे कामे  मार्गी लावण्यासाठी आलेल्या नागरिकांनी ‘अशा  या लगीनघाईत कार्यालयात कुणीही नाहीत’ असा सूर आळवला.

नगरपालिकेत सकाळच्या सत्रात कुणीही नसले तरी, दुपारच्या सुमारास   अकाउंट विभागाचे कर्मचारी व शिपाई सोडून एकही अधिकारी अथवा कर्मचारी नगरपालिकेत उपस्थित नसल्याचे  दिसून आले. यामुळे पालिका कर्मचार्‍यांनी अघोषित संप तर पुकारला नाही ना, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला.  दरम्यान, लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे  चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

शासकीय कामाच्या नावाखाली अधिकारी कर्मचारी पगारी सुट्टीवर जाण्याचे प्रमाण जास्त असल्याची चर्चा आहे. याबाबत ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने पालिकेतील संबंधित कर्मचार्‍यास हजेरी बुक दाखवण्यास सांगितले  असता, त्याने नकार देऊन मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त नाशिक येथे गेल्याचे सांगितले. तर नगरपालिकेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वरिष्ठ अधिकारी वा लोकप्रतिनिधी यांचा धाक राहिला नसल्याचे दिसून आले.

तर एका उच्चपदी असलेल्या लोकप्रतिनिधीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अधिकारी व कर्मचारी हे नगर परिषदेला दुर्मिळ झाल्याने अधिकारी यांचा मनमानी कारभार वाढत आहे. नगरपालिकेत  वारंवार जाऊनसुद्धा कर्मचारी नागरिकांची कामे करीत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे मिळतात. याबाबत मुख्याधिकारी   यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला असता, त्यांना भेटण्यासाठी दुपारी  3 ते 4 या वेळेचा फलक दाखविला जातो. तर याबाबत मुख्याधिकारी डॉ. केरुरे व कार्यालयीन प्रमुख गरुड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

दोन तासांपासून नगरपालिकेत जन्माचा दाखला घेण्यासाठी नाशिक येथून आलो. परंतु येथे एकही अधिकारी व   कर्मचारी हजर नाहीत. ते कुठे गेले याबाबतही कोणी सांगत नसल्याने दिवस वाया गेला. तसेच तेथे उपस्थित  कर्मचार्‍यांमध्ये साहेब व काही कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाला गेल्याची चर्चा आपापसांत सुरू होती. - संदेश  गोसावी, नाशिक