Sat, Aug 24, 2019 23:24होमपेज › Nashik › नायलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल

नायलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:21PM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

नायलॉन मांजावर बंदी असतानाही नियमाची पायमल्ली करीत शहरातील काही ठिकाणी  छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोळे गल्ली येथील प्रवीण गवते व नागड दरवाजा भागातील फारुख मो. हारुण या दोघांकडून  सुमारे अकरा हजार पाचशे किमतीचा नायलॉन मांजा जप्‍त करण्यात आला. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर येवला शहरात पतंगाची मजा लुटताना रंगाचा बेरंग होऊ नये, म्हणून नायलॉन मांजावर बंदी घातली असूनही विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. निरीक्षक राजेश शिंगटे, उपनिरीक्षक संदीप पाटील, नितीन पगारे, अतुल फलके, बाळकृष्ण जाधव, वंदना वाघ, तसेच गोपनीय शाखेचे चंद्रकांत निर्मल, सोमासे यांच्या पथकाने अचानक धाडी टाकून शहरातील गवते याच्याकडून तीन हजार नऊशे रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे सहा बंडल, तसेच  फारुख मो. हारुणकडून सात हजार सहाशे रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 11 बंडल जप्‍त केले.

13 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान साजरा होणार्‍या पतंगोत्सावात नायलॉनचा मांजा वापरताना जो आढळेल, त्याच्यावरही कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. संक्रांत सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी शहरभरात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केल्याने अनेक अवैध मांजाविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. नागरिकांनीही नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.