होमपेज › Nashik › पोषण आहारही ‘आधार’शी लिंक

पोषण आहारही ‘आधार’शी लिंक

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

कुपोषित बालकांना पुरविण्यात येणार्‍या पोषण आहाराबाबत तक्रारी असल्याने आता हा पोषण आहारही आधारकार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘अस्मिता’ महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी राज्यात कुपोेषणाचा प्रश्‍न गंभीर होऊ पाहत असल्याचे सांगितले. खरे तर, कुपोषणाबाबत आदिवासी भागातील जनतेत जागृती होणे आवश्यक आहे. कमी वयात लग्‍न होत असल्याने जन्माला येणारे बाळही कुपोषित असते. अंधश्रद्धा अजूनही ठासून भरलेली असून, तेही एक कारण कुपोषणामागे असल्याचे मुंडे म्हणाल्या. दुसरीकडे कुपोषण निर्मूलनासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असल्या तरी त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचतच नाहीत, असे विचारल्यावर पोषण आहार आधारशी लिंक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुपोषण वाढत असले तरी बालमृत्यू मात्र घटले असल्याचा दावा त्यांनी केला. एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीवर पंकजा मुंडे यांनी अवॉर्ड मिळाले म्हणून धनंजय यांची गळाभेट घेतली त्यात वाईट काय, असा प्रतिसवाल केला. अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाला मिळालेल्या पंचवीस लाख रुपयांपैकी वीस लाख रुपये अस्मिता योजनेसाठी दिले. 

काँग्रेसने केलेल्या उपोषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपोषण केले. तसेच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह आमदार-खासदारांनाही आपल्या भागात उपोषण करण्यास सांगितले आहे. त्यावर ना. पंकजा मुंडे यांना विचारले असता, अधिवेशन वाया गेल्याने पंतप्रधानांना खूप दु:ख झाले म्हणूनच त्यांनी आत्मक्‍लेश केला. या आंदोलनात आपणही सहभागी असल्याचे त्या म्हणाल्या.