Sat, Jul 20, 2019 02:36होमपेज › Nashik › आता घराभोवतीच्या मोकळ्या जागांवरही घरपट्टी आकारणी

आता घराभोवतीच्या मोकळ्या जागांवरही घरपट्टी आकारणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

आजवर निवासी, अनिवासी घरपट्टी भरणार्‍या नाशिककरांनो आता तुम्हाला मोकळे भूखंडच नव्हे, तर पार्किंगच्या जागेसाठीसुद्धा घरपट्टी भरावी लागणार आहे. मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी शहरवासीयांच्या दृष्टीने घेतलेल्या या अत्यंत घातक निर्णयाने मालमत्ताधारकांचे कंबरडे मोडणार आहे. केवळ मोकळ्या जागाच नाही तर मालमत्ता सर्वेक्षणात आढळून आलेल्या 60 हजार मिळकतीही या नवीन कररचनेत येणार असून, घरदुरुस्ती वा नवीन बांधकाम केल्यास मिळकतधारक नव्या कराच्या फासात गुरफटणार आहे. एकूणच मनपाच्या या सुलतानी निर्णयामुळे मिळकतधारकांना आता इंच-इंच जागेचा हिशेब मनपाला द्यावा लागणार आहे.

मनपाच्या 2018-19 साठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नवीन कर रचना जाहीर केली आहे. त्यानुसार आयुक्‍तांच्या अधिकारात वार्षिक भाडे मूल्य आकारण्यात येणार असून, त्यातून जुन्या मिळकती वगळण्यात आल्या आहेत. परंतु, याच जुन्या मिळकतींमध्ये बदल करायचा असेल वा नूतनीकरण करावयाचे असेल तर मग नव्या करानुसार घरपट्टी अदा करावी लागणार आहे. वार्षिक भाडे मूल्य यापूर्वी 40 पैसे प्रतिचौरस फूट याप्रमाणे आकारले जायचे. मात्र आता हे मूल्य दोन रुपये करण्यात आल्याने नागरिकांना पाचपट आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. नव्या मिळकती, नवीन बांधकामे तसेच मनपाने केलेल्या मिळकत सर्वेक्षणात आढळून आलेल्या 60 हजार मिळकतीही या कराच्या कचाट्यात सापडणार आहेत. त्याचबरोबर आजवर मोकळ्या मैदानांंवर कर आकारला जात नव्हता. आता शहरातील मोकळे भूखंड, बंगल्यातील मोकळी जागा, इमारतींच्या पार्किंग व सामासिक अंतरही या करामध्ये समाविष्ट करून कर आकारला जाणार आहे. या करातून मनपाला येत्या वर्षभरात 250 कोटींचा महसूल मिळणार असला तरी सामान्य व गोरगरीब नाशिककरांना मनपाच्या या जिझिया कराचा सामना करावा लागणार आहे. 1 एप्रिलपासूनच या नव्या कराची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्‍तांनी विविध कर विभागाला दिले आहेत. 

असे होणार घरपट्टीत बदल 

निवासी क्षेत्रात सध्या आरसीसी बांधकामासाठी 50 पैसे चौ. फूटप्रमाणे घरपट्टी आकारणी होत आहे. आता नव्या मिळकतींना हाच दर 2 रुपये चौ. फूट इतका आकारला जाईल. गावठाणमधील आरसीसी सध्या 40 पैसे दर असून, नव्या रचनेनुसार 1.60 पैसे दर आकारणी होणार असून, कौलारू घरांसाठी 40 पैशांवरून 1.60 पैसे आकारले जाणार आहेत. तर कच्चे व पत्र्याचे शेड असलेल्या घरांसाठी 20 पैशांवरून 1.10 पैसे मोजावे लागतील. अनिवासी क्षेत्रातील आरसीसीच्या बांधकामासाठी सध्या 1.20 पैसे प्रतिचौ. फूटप्रमाणे दर आकारले जात असून, नव्या करानुसार हाच दर आता 7.20 पैसे इतका झाला आहे. गावठाणमधील आरसीसीसाठी 4.90 पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच कौलारू बांधकामासाठी 75 पैशांऐवजी 4.80 पैसे तसेच गावठाणमधील कौलारू घरांसाठी 60 पैशांवरून 4.80 पैसे दर आकारणी होईल. पत्र्याच्या शेडसाठी 45 पैशांऐवजी 3.60 पैसे तर गावठाणमधील पत्र्याच्या शेडसाठी 45 पैशांवरून नव्याने 2.50 पैसे घरपट्टी भरावी लागणार आहे. 

जागेला 40 पैसे प्रतिचौ. फूट 

मोकळ्या जागा व भूखंडासाठी पूर्वी 3 पैसे प्रतिचौ. फूट याप्रमाणे कर आकारणी होत होती. आता 40 पैशाने म्हणजेच जवळपास 13 पटीने मिळकतधारकांना मोकळ्या जागेसाठी घरपट्टी भरावी लागणार आहे. एखाद्या मिळकतीला मिळत असलेले भाडे विचारात घेऊन कर योग्य मूल्य ठरविले जाते. 

अधिनियमातही स्पष्टता नाही

मुंबई मनपा अधिनियमातील कलम 128 (अ) नुसार तसेच 127 नुसार कर आकारणी करण्याची तरतूद आहे. तसेच कलम 2 (49) नुसार सर्व प्रकारच्या इमारती व जमिनींवरील कर असा उल्लेख असला तरी जमिनी यविषयी मात्र कोणतीही व्याख्या देण्यात आलेली नाही की कर आणि दर ठरविण्याबाबतही उल्लेख नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे भविष्यात या करवाढीवरून नाशिककरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. 

1600 ऐवजी साडेसहा हजार कर 

निवासी भागातील 500 चौ. फुटाच्या घरासाठी सध्याच्या करानुसार वर्षाला 1647 इतकी घरपट्टी आकारली जाते. नव्या कराप्रमाणे हीच घरपट्टी 6500 इतकी येणार आहे. तसेच अनिवासी भागातील 500 चौ. फुटाच्या गाळ्यासाठी सध्याच्या रचनेनुसार 3952 रुपये घरपट्टी येत असेल तर नव्या करानुसार हीच घरपट्टी तब्बल 23 हजार 716 पर्यंत पोहोचेल. 500 चौ. फूट आकाराच्या मोकळ्या भूखंडासाठी 98 रुपये वार्षिक घरपट्टी येत असेल तर आता हीच घरपट्टी एक हजारापर्यंत जाणार आहे. 

सत्ताधारी विरोधक येणार एकत्र 

आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या प्रमाणावर घरपट्टीत वार्षिक भाडे मूल्य वाढ केल्याने सत्ताधार्‍यांसह विरोधकही नाराज झाले असून, आयुक्‍तांच्या या निर्णयाविरोधात सर्वचजण एकत्र येऊन दंड थोपटणार आहेत. यामुळे घरपट्टीच्या याच कारणावरून आता आयुक्‍तांविरोधात लोकप्रतिनिधींचा संघर्ष सुरू होणार आहे.

बांधकाम व्यवसायावर आर्थिक संकट

नव्या बांधकामांना नव्या रचनेनुसार घरपट्टी आकारणी केली जाणार असल्याने मनपाच्या या निर्णयाने शहरातील बांधकाम व्यवसायावर पुन्हा आर्थिक संकट कोसळणार आहे. आधीच टीडीआर, कपाटप्रश्‍न, हरित लवाद असे विविध प्रश्‍नांमुळे बांधकाम व्यवसाय जेरीस आलेला असताना आता मोठ्या प्रमाणावर घरपट्टी आकारणी होणार असल्याने लोक नवीन मिळकतींऐवजी जुन्या मिळकतींनाच प्राधान्य देतील, अशी शक्यता व्यक्‍त केली जात आहे.

Tags : Nashik, Nashik News,  housekeeping charge, open seats, around, house


  •