Sun, May 26, 2019 14:59होमपेज › Nashik › आता सोयीच्या शाळेसाठी गुरुजींची धावपळ

आता सोयीच्या शाळेसाठी गुरुजींची धावपळ

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी

सरकारी पातळीवरून झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विस्थापित झाल्याच्या तक्रारीवरून काही शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर आता बदल्या झालेल्या शिक्षकांनी सोयीची शाळा मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शेकडो अर्जांचा ढीग साचला असल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण बारा हजाराच्या दरम्यान शिक्षकांची संख्या असून, त्यापैकी जवळपास साडेचार हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून बदल्यांची कार्यवाही खुद्द सरकारी पातळीवरूनच हाताळण्यात आली. ऑनलाइन अर्ज मागविताना शिक्षकांकडून 20 विकल्पही भरून घेण्यात आले. म्हणजे, 20 पैकी ज्या शाळेत जागा रिक्त असेल तर त्याठिकाणी संबंधित शिक्षकाला नियुक्ती देण्यात येणार होते. विकल्पानुसार बदलीची शाळाही सरकारी पातळीवरून निश्‍चित करून देण्यात आली. आदेश बजाविण्याचे काम केवळ शिक्षण विभागाने केले.

बदली प्रक्रियेनंतर 592 शिक्षकांनी विस्थापित झाल्याची तक्रार करीत दहा दिवस जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण केले. त्यापाठोपाठ ज्यांची बदली झाली त्या शिक्षकांनी आता सोयीची शाळा मिळावी म्हणून शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत. म्हणजे, ऑनलाइन अर्जात पसंतीनुसारच विकल्प भरून दिल्यानंतरही संबंधित शिक्षकांना मिळालेली शाळा सोयीची वाटत नसल्याचा साक्षात्कार बदलीचा आदेश हाती पडल्यानंतर झाला, हे विशेष! शिक्षण विभागाला जवळपास 500 अर्ज प्राप्त झाले आहेत.

बदलीची प्रक्रिया सरकारीपातळीवरून राबविण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या हातात काहीच नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा बदलून मिळण्यासाठी प्राप्त झालेले सारेच अर्ज सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शाळा सुरू होऊन आठवडा झालेला असताना शिक्षकांची सोयीची शाळा मिळविण्यासाठी धडपड सुरू असल्याने विद्यार्थी वार्‍यावर असल्याचे बोलले जाते.