Mon, Mar 25, 2019 09:26होमपेज › Nashik › सप्‍तशृंगगडावर आता प्लास्टिक बाटल्यांची शास्त्रोक्‍त विल्हेवाट

सप्‍तशृंगगडावर आता प्लास्टिक बाटल्यांची शास्त्रोक्‍त विल्हेवाट

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:34AMनाशिक : प्रतिनिधी

राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्‍तशृंगगड येथे आता रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लागू शकणार आहे. त्यासाठी गडावर वॉटर बॉटल क्रशिंग मशीन बसविले जाणार असून, त्याचा शनिवारी (दि. 16) लोकार्पण समारंभ होणार आहे. 

राज्यातील साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. सप्‍तशृंगीमातेचे मंदिर उंच डोंगराच्या कुशीत असल्याने भाविक गडावर चढताना त्यांच्याकडचे अनावश्यक साहित्य फेकून देतात. त्यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा सर्वाधिक समावेश असतो. भाविक दर्शन घेऊन खाली परतल्यावरही पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात व पाणी प्यायल्यावर त्या फेकून देतात. गडावर वनराई व काटेरी झुडपे असून, हवेने उडणार्‍या प्लास्टिक बाटल्या सर्वत्र पसरतात. त्या उचलणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त उन्मेष गायधनी यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटीच्या अध्यक्ष अलका सिंग यांना ही समस्या सांगितली. त्यावर त्यांनी नुकत्याच साजर्‍या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाला ट्रस्टला प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन देण्याचे जाहीर केले. त्यानुसार क्लबच्या सचिव ज्योतिका पै व जनसंपर्क संचालक जयंत खैरनार यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभा राहत आहे.

या मशीनमुळे सप्‍तशृंगगड परिसरातील प्लास्टिक बाटल्यांची पर्यावरणपूरक शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छता राखणे सोपे होणार असून, प्रदूषणही टळणार आहे. या मशीनचा लोकार्पण समारंभ शनिवारी (दि. 16) सकाळी 11.30 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्याला अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळ व ट्रस्ट प्रशासनाने केले आहे.