Thu, Apr 25, 2019 16:24होमपेज › Nashik › संघर्षानंतर आता विकासयात्रा 

संघर्षानंतर आता विकासयात्रा 

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहराशी माझे अनेक जुने ऋणानुबंध जोडलेले आहेत. नाशिकला यापूर्वी संघर्षयात्रा घेऊन आले होते. आता विकासयात्रा घेऊन येणार असून, त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण विकास व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे केले. 

भाजपाच्या वसंतस्मृती येथील शहर कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, उपमहापौर प्रथमेश गिते, सरचिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, विक्रांत चांदवडकर आदी उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, भाजपाला अनेक वर्षांनंतर केंद्र व राज्यात सत्ता मिळाली आहे. या सत्तेचा उपयोग तळागाळातील व सामान्य नागरिकांच्या भल्यासाठी केला पाहिजे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी आपले काम केले पाहिजे. सत्ता टिकविण्यासाठी लोकांपर्यंत गेले पाहिजे तरच ते शक्य आहे. विरोधी पक्षातील नेते भाजपावर दररोज नवनवीन आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जातीपातीचे विष कालवून नागरिकांची दिशाभूल करत आहे. परंतु, याविषयी न डगमगता खरी स्थिती काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे असल्याचे ना. मुंडे यांनी सांगितले. भाजपाला सामान्य नागरिकांनी मोठे केले आहे. ही जाणीव कधी विसरता कामा नये. पक्षाला मोठे करणार्‍या सच्चा कार्यकर्त्यांच्या पदरी काही तरी पडावे यासाठी आपण पक्षश्रेष्ठींशी बोलणार असून, यापुढेही पक्ष कार्य करताना एकजूट ठेवावी, असे आवाहन केले. आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याची ही वेळ आहे. महापौर रंजना भानसी व आमदार सानप यांच्या हस्ते ना. मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपा नेते विजय साने, संभाजी मोरुस्कर, दिनकर पाटील, अनिल भालेराव, शीतल माळोदे, प्रियंका घाटे, ऋची कुंभारकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.