Tue, Apr 23, 2019 09:48होमपेज › Nashik › जिल्हा परिषदेच्या दोन कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांना नोटिसा

जिल्हा परिषदेच्या दोन कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांना नोटिसा

Published On: Jan 25 2018 1:49AM | Last Updated: Jan 25 2018 1:48AMनाशिक : प्रतिनिधी

बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून बदलीत सूट मिळविणार्‍या दोन कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटिसा बजावून दणका दिला आहे. बुधवारी (दि.24) दिवसभर यापैकी एका अधिकार्‍याची धापवळ सुरू होती. 

आमदार बच्चू कडू यांनी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांची भेट घेऊन अपंगांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली, तेव्हा बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवून लाभ घेतल्याची बाब उजेडात आणून दिली होती. त्यावेळी अशा बनावट अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आश्‍वासन मीना यांनी दिले होते. त्यानुसार पडताळणी सुरू असून, दोघा कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांनीच बनावट प्रमाणपत्र मिळविल्याचे उघडकीस आले आहे.

ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले सहायक प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील योगीराज गोसावी यांचा त्यात समावेश असून, पडताळणीअंती संबंधितांचे प्रमाणपत्र हे अपंग प्रमाणपत्र नाहीच, असे जेे. जे. रुग्णालयाने कळविले आहे. याच प्रमाणपत्रांच्या आधारे बदलीस पात्र असतानाही त्यातून वर्षानुवर्षे सूट मिळविल्याचेही उघड झाले आहे. अपंगांचे इतर लाभही पदरात पाडून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

तसेच, संघटनेचे पद रातोरात मिळवून या पदाचा वापरही बदलीत सूट मिळविण्यासाठी करण्यात आला होता. बनावट अपंग प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आल्याने या दोघांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या असून, आठ दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

मुख्यालयात कार्यरत काही सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांचे कामकाज वादग्रस्त ठरले आहे. परिचर बदल्यांमध्ये अपंगांवर अन्याय केल्याच्या आरोपावरून सदाशिव बारगळ यांची आधीच विभागीय चौकशी सुरू आहे. असे असताना या सहायक प्रशासन अधिकार्‍याला मुख्यालयातच ठेवून प्रशासनाने त्याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका बजावली आहे. त्यातच बनावट अपंग प्रमाणपत्रावरून तर आणखी दोन सहायक प्रशासन अधिकारी जाळ्यात अडकले आहेत.