होमपेज › Nashik › शांतता राखण्यासाठी आंदोलकांना नोटिसा

शांतता राखण्यासाठी आंदोलकांना नोटिसा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शहरात सहा महिने शांतता राखण्यासाठी 17 आंदोलकांना 10 हजार रुपयांचे बंधपत्र का घेऊ नये? अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांनी नाराजी वर्तवली असून, नोटिसा बजावून कार्यकर्त्यांसह आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 

शेतकर्‍यांविषयी ‘अपशब्द’ प्रयोग केल्याच्या निषेधार्थ सुकाणू समितीचे पदाधिकारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना काळी शाल, बेशरमाचे फूल, काळा बुक्का देऊन सत्कार करणार होते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात बसवले होते. रविवारी (दि.26) दानवे यांची आंदोलक शेतकर्‍यांसोबत चर्चा होणार होती, मात्र संविधान दिनानिमित्ताच्या कार्यक्रमांमुळे दानवेंची भेट होऊ शकली नाही.

दरम्यान, विभाग दोनचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. राजू भुजबळ यांनी 17 आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बंधपत्र का घेऊ नये, याबाबत आंदोलकांकडून उत्तर मागवले आहे. तसेच मुदतीत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईमुळे आंदोलकांनी नाराजी वर्तवली. आंदोलन न करताही कारवाई करणे योग्य नसून दडपशाही असल्याचा आरोप आंदोलकांनी व्यक्‍त केला.