Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Nashik › नाशिक मनपाच्या २४ अधिकार्‍यांना नोटिसा

नाशिक मनपाच्या २४ अधिकार्‍यांना नोटिसा

Published On: May 17 2018 1:26AM | Last Updated: May 16 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी 

महापालिकेतील दैनंदिन कामकाजात हजलगर्जीपणा व कसूर केल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि.15) 24 विभागप्रमुखांना शिस्तभंगाच्या नोटीसा बजावून कारवाई का करु नये, असा जाब विचारला आहे. याबाबत खुलासा करण्यासाठी पुढील तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आल्याने अधिकार्‍यांना घाम फुटला आहे. या प्रकरणी आयुक्त काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, विभागप्रमुखांचे धाबे दणाणले आहेत.

आयुक्त मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी नव्वद दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर कोणतीही दयामाया न दाखवता कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. अल्टीमेटम पूर्ण झाल्याने कोणाची तळी भरली जाणार, अशी चर्चा महापालिकेत रंगली होती. मागील सोमवारी (दि.7) आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजांचा आढावा घेतला. त्यात ई पत्र व फाईल्स नोंदणी व्यवस्थापन, संगणकीय कार्यप्रणाली व गुगल स्प्रेडशिट यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. कामात गती आणावी याबाबत आयुक्तांनी वेळोवेळी विभागप्रमुखांना बजावले होते. मात्र, तरीदेखील विभागप्रमुखांनी त्यांच्या कामकाज शैलीत सुधारणा केली नसल्याचे बैठकीत उघड झाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

तसेच, महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनादेखील कामात कसूर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. वॉक विथ कमिशनर उपक्रमातअंतर्गत प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदी प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रशासन शाखेकडून पाठविले जातात. अतिरिक्त आयुक्त बोर्डे यांच्यानियंत्रणाखालील विभागांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, विभागप्रमुखांनी निवेदने प्रलंबित ठेवले. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बोर्डे यांनादेखील नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त बोर्डे व विभाग प्रमुखांना पुढील तीन दिवसांत खुलासा मागितला असून, उत्तरे समाधानकारक नसल्यास शिस्तभंगची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. यापूर्वी कामात कसूर केल्याप्रकरणी आयुक्तांनी काही जणांवर निलंबनाची कारवाई केली. तर, काही कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली आहे.