Thu, Jul 18, 2019 08:40होमपेज › Nashik › नाशिक बाजार समितीमागे चौकशीचा ससेमिरा सुरूच

नाशिक बाजार समितीमागे चौकशीचा ससेमिरा सुरूच

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 20 2018 1:18AMपंचवटी : वार्ताहर

बाजार समितीतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कंबर कसली असून आलेल्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा केली जात आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच समितीच्या दोन कर्मचार्‍यांची दिवसभर चौकशी करण्यात आली असून त्यांची आणखी सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सन 2014 मध्ये 64 कोटींचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघडकीस आले. तसेच कर्मचार्‍यांच्या वेतनातील फरक गैरव्यवहार, अवैधरित्या बाजार समितीची जमीन विक्री, गाळे विक्री, एफएसआय विकणे, बाजार समितीचे नुकसान आर्थिककारणे, बाजार समितीचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली होती. याप्रकरणातील दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर बाजार समितीतील गैरव्यवहारांविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.  या चौकशी सत्रामुळे बाजार समितीच्या गैरव्यवहारांची पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याचे समोर आले असून तक्रारदारांच्या तक्रारींवरून अनेक घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग समितीच्या कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करीत आहे. मंगळवारी (दि.17) समितीच्या दोन वरिष्ठ कर्मचार्‍यांची दिवसभर चौकशी करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. या चौकशीत दोघा कर्मचार्‍यांकडे मागील काही वर्षांमधील ठराव कसा संमत झाला याची माहिती मागवली असल्याचे कळते. तसेच येत्या काही दिवसांत या तक्रारींवरून आणखी काही कर्मचार्‍यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.