Sat, May 30, 2020 04:19होमपेज › Nashik › ‘धूम्रपान निषिद्ध’ फलक गायब

‘धूम्रपान निषिद्ध’ फलक गायब

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AM
नाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सिगारेटस आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात आणि व्यापार विनियम, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंधक कायदा) अधिनियम, 2003 प्रमाणे म्हणजेच कोटपा कायद्यान्वये सर्व शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक ठिकाणी ‘धूम्रपान निषेध क्षेत्र’चे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील अपवादात्मक क्षेत्र वगळता इतर कोठेही हे फलक दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कायद्याचा कोणताही धाक नसल्याने शहरात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान होत आहे. 

कोटपा कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांविरोधात दंडात्मक किंवा कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याचा पोलीस प्रशासनास विसर पडल्याने शहरात सर्वत्र खुलेआम धूम्रपान केले जात असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे शहरातील सार्वजनिक, शासकीय व निमशासकीय आणि शैक्षणिक संस्थांजवळ धूम्रपान निषिद्ध क्षेत्र असा मजकूर असलेले 60ु30 सेंटिमीटर आकारात फलक लावणे आवश्यक आहे. मात्र, याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे देखील कायद्याची अंमलबजावणी होण्यास अडसर येत आहे. त्याचप्रमाणे कोटपा कायद्यातील कलम 5 ते 7 नुसार विक्रेत्यांना किरकोळ सिगारेटची विक्री करता येत नसतानाही विक्रेते सुट्ट्या सिगारेट्सची विक्री करीत आहेत. त्यामुळे धूम्रपान करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.