Fri, Apr 26, 2019 02:08होमपेज › Nashik › आता दीड महिन्याने शुभमंगल 'सावधान'! 

आता दीड महिन्याने शुभमंगल 'सावधान'! 

Published On: Dec 21 2017 9:57AM | Last Updated: Dec 21 2017 9:57AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

तुळशी विवाहानंतर 11 नोव्हेंबरपासून लग्नसराईस प्रारंभ झाला. अनेकांनी पहिल्या टप्प्यातच म्हणजे 12 डिसेंबर 2017 पर्यंत विवाह करून घेतले. त्यानंतर आता 6 फ्रेबुवारीपर्यंत अर्थात सुमारे दीड महिना विवाहोत्सुकांना आता वाट बघावी लागणार आहे. दीड महिने लग्नसराई नसल्यामुळे मंगल कार्यालय लॉन्ससह पूरक व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यापारी, व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

पौष महिना असल्याने अस्त असल्यामुळे विवाह करू नये असे संकेत ज्योतिषाचार्यांनी दिले. यंदा नोव्हेंबर 2017 ते जुलै 2018 या नऊ महिन्यांच्या काळात केवळ 53 विवाहमुहूर्त उपलब्ध आहेत. तुळशी विवाह पार पडल्यानंतर लग्नांचा धुमधडाका जोरदारपणे सुरू झाला. एकाच दिवशी चार-पाच विवाह असल्यामुळे नातेवाइकांची धावपळ पाहावयास मिळाली. तसेच मुहूर्त कमी असल्याने विवाहोत्सुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढील वर्षी अधिक मास आल्याने या काळात मुहूर्त नाही. तर पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत असून, तो 16 मे ते 13 जून दरम्यान आहे. त्या कालावधीत एकही विवाह मुहूर्त नाही. सुमारे दीड महिना विवाह नसल्यामुळे आता लॉन्स-मंगल कार्यालय, सराफी व्यवसाय, मंडप डेकोरेटर्स, केटरर्ससह पूरक व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी, व्यावसायिकांनी दिली आहे. 

सुमारे दीड महिना विवाह नसल्यामुळे त्याचा सराफी व्यवसायावर काहीसा परिणाम जाणवू लागला आहे. अनेक वधू -वर मंडळींच्या कुटुंबीयांनी सोन्याचे दागिने खरेदी केले आहेत, तर काही कुटुंब विवाहाच्या काही दिवस अगोदर खरेदी करतात. त्यामुळे व्यवसाय काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. - प्रमोद कुलथे, अध्यक्ष,
नाशिक सराफ संघटना

दरवर्षी 5 ते 20 दिवसांच्या कालावधीचे शुक्राचे अस्त असते. या काळात विवाह करण्यात येत नसल्याचा दाखला ज्योतिषशास्त्रात येतो. यंदा 13 डिसेंबर ते 6 फेब्रुवारी 2018 अशा दीड महिन्याचे अस्त असल्यामुळे विवाह होणार नाही. - सतीश शुक्ल, अध्यक्ष, नाशिक पुरोहित संघ