होमपेज › Nashik › ‘हल्लाबोल’च्या निमित्ताने बनकरांना बूस्टर डोस!

‘हल्लाबोल’च्या निमित्ताने बनकरांना बूस्टर डोस!

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:11AMउगाव : वार्ताहर

राज्यातील भाजपा-सेना सरकारविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात निफाडला सभेने चांगलीच गाजली आहे. सरकारविरोधातील आसूड ओढताना बहुतांश नेत्यांनी आपल्या भाषणात आगामी काळात निफाडच्या रणांगणात माजी आमदार दिलीप बनकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यातच वर्ष-दीड वर्षावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले गेल्याने सलग दोनदा विजयाने हुलकावणी दिलेल्या माजी आमदार दिलीप बनकरांसाठी निफाडची हल्लाबोल सभा ‘बूस्टर डोस’ ठरली आहे.

निफाडच्या राजकीय पटलावर विधानसभेबरोबरच निफाड साखर कारखाना, रानवड साखर कारखाना, लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघ ही महत्त्वाची सत्तास्थाने आहेत. त्यातील दोनही साखर कारखाने आजमितीस सत्तेच्या कृपाछत्रात नाहीत. मात्र, राजकीय पटलावर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत आहेतच. माजी आमदार दिलीप बनकरांना विद्यमान आमदार अनिल कदम यांनी 2009 च्या विधानसभेत खिंडित गाठत सत्ता हस्तगत केली होती.

त्यानंतरच्या 2014 मधील निवडणुकीत तर दिलीप बनकरांना विजयाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली. शिवसेना आमदार कदम व माजी आमदार बनकर सत्तासंघर्ष गावा-गावांत टोकाला जात असतानाच पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत उभयतांदरम्यान झालेल्या यशस्वी समझोत्याने बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली. पण दोनही नेत्यांचे ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्तेही सावध झाले होते. विरोधकालाही जवळ बोलावत आपल्या डायलॉगने घायाळ करीत विद्यमान आमदार अनिल कदम यांनी सोशल मीडियासह गावागावांत स्नेह वाढविला होता. मात्र, सलग दुसर्‍यांदा आमदारकी मिळून सत्तेत असूनही तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांबाबत सुप्तावस्थेतील संताप सोशल मीडियातून बाहेर पडू लागला.

याबाबत जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व माजी आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम यांनी लाक्षणिक आंदोलन केले. त्यांनी तालुक्यातील तरुणाईसह केलेला एल्गार चांगलाच चर्चेत आला. गावागावातील तरुण अन् ज्येष्ठ यांच्या गाठी-भेटी सूत्रबद्ध पद्धतीने घेत घेत आपली राजकीय कारकीर्द विस्तारासाठी यतीन कदमही सरसावले. त्याचदरम्यान  विद्यमान आमदार अनिल कदमांनी तालुक्यात सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने भगव्या सप्ताहातून विकासकामांचे भूमिपूजन अन् लोकार्पण सोहळे केले. भाजपानेही बुथप्रमुखांच्या बैठकांनी राजकीय सक्रियता कायम ठेवली. येऊ घातलेल्या विधानसभेच्या रणांगणाची तयारी वेगाने सुरू झाल्याच्या चर्चा गावच्या पारावर अन् वेशीवर धडकू लागल्या.

या राजकीय घडामोडीत माजी आमदार दिलीप बनकर अन् पर्यायाने राष्ट्रवादीला हल्लाबोलसारख्या मुक्त व्यासपीठाने बूस्टर डोस दिला आहे. तालुकाभरात माजी आमदार दिलीप बनकर, तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी हल्लाबोल यात्रेच्या प्रचाराच्या निमित्ताने गावागावातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणले होते. सामान्य शेतकरी, मजूर, नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक यांना हल्लाबोल सभेसाठी येण्याचे आवाहन केले. भाजपा-सेना सरकारच्या नाकर्तेपणावरून निघालेल्या या हल्लाबोल मोर्चात निफाडमध्ये राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

बैलगाडीद्वारे नेत्यांना सभास्थळी आणताना रॅलीत सहभागी जनसमुदाय नजरेत भरणारा होता. हा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् सभेची गर्दी बघता बनकरांचे हौसले बुलंद होणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीने आपली क्षमता दाखवून देण्यात तसूभरही कमतरता ठेवली नाही. त्यामुळेच सरकारच्या विविध योजना अन् धोरणांवर घणाघात करताना मंचावरील राज्यपातळीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात माजी आमदार दिलीप बनकरांच्या मागे सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे केलेले आवाहन दिलीप बनकरांना विधानसभेची उमेदवारी अनौपचारिकरीत्या जाहीरच केल्याचे द्योतक आहे.

जसे हल्लाबोलचा प्रचारप्रसार करीत गावागावांत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन दिलीप बनकर फिरत होते. तसेच पुढील कालावधीतही बनकरांना पायाला भिंगरी लावल्यागत फिरावे लागणार आहे. त्यासाठी  रानोमाळ अन् गल्ली-बोळातील नागरिकांशी थेट जनसंवादाचे माध्यम अधिक प्रभावी करावे लागणार आहे.