Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Nashik › डोळ्यात मिरची फेकून नऊ लाख लंपास

डोळ्यात मिरची फेकून नऊ लाख लंपास

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:15PMलासलगाव : वार्ताहर 
विंचूर येथे व्यापर्‍याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून नऊ लाख रुपये लंपास केले आहे. लासलगाव-विंचूर रोड अ‍ॅक्सिस बँकेसमोर ही घटना घडली. राहुल सानप असे लूट झालेल्या व्यापर्‍याचे नाव आहे. सानप हे कांद्याचे व्यापारी असून, त्यांनी शेतकर्‍यांच्या चुकवतीसाठी सोमवारी (दि.23) अ‍ॅक्सिस बँक शाखेतून नऊ लाख रुपये काढले आणि आपल्या मारुती स्विफ्ट कारमध्ये बसले असता तिथेच उभे असलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांपैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, व्यापारी राहुल यांनी त्याला विरोध केला असता दुसर्‍या युवकाने राहुल यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून नऊ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. राहुल यांनी आरडाओरडा करताच काही लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. बँकेतील व्यवहारांवर लक्ष ठेवून रोख रक्‍कम काढणार्‍या ग्राहकांवर पाळत ठेवून ही घटना घडली आहे. दोन महिन्यांत ही तिसरी घटना घडली आहे. आत्तापर्यंत पोलिसांना एकाही घटनेचा तपास करण्यात यश आलेले नाही. या घटनेमुळे लासलगाव परिसरातील व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags : Nashik,  Nine lakh lapses, Eye chilli thrown, nashik news,