Fri, May 24, 2019 09:16होमपेज › Nashik › नाट्य परिषदेसाठी नाशिकमधून नऊ अर्ज

नाट्य परिषदेसाठी नाशिकमधून नऊ अर्ज

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यत्वाच्या तीन जागांसाठी नाशिकमधून नऊ अर्ज दाखल झाले असून, सोमवारी (दि. 22) छाननीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नाशिकमधून बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू असून, त्यामुळे गुरुवारच्या (दि. 25) माघारीकडे लक्ष लागून आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नाट्य परिषदेचे राज्यात 23 हजार 489 सभासद असून, 350 सभासदांसाठी एक नियामक मंडळ प्रतिनिधी असे समीकरण आहे. त्यानुसार नियामक मंडळावर राज्यातून 60 सदस्य निवडून येणार आहेत. त्यांतून मध्यवर्ती शाखेची कार्यकारिणी निवडली जाणार आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातून 2, नगर जिल्ह्यातून 1 व जळगाव जिल्ह्यातून 1 असे उत्तर महाराष्ट्रातून 4 सदस्य नियामक मंडळावर जात होते.

मात्र, नव्या घटनेनुसार आता नाशिक शाखेतून 3, नगर-संगमनेर-शेवगाव मिळून 2 व धुळे-जळगाव-मुक्ताईनगर शाखा मिळून 2 असे एकूण 7 नियामक मंडळ सदस्य निवडले जाणार आहेत. पैकी शनिवारपर्यंत (दि. 20) निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याकडे नाशिकमधून नऊ अर्ज दाखल झाले होते. त्यांत विद्यमान सदस्य सुनील ढगे, राजेंद्र जाधव यांच्यासह प्रा. रवींद्र कदम, नाट्यलेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी, प्रफुल्ल दीक्षित, गिरीश गर्गे, विशाल जातेगावकर यांचा समावेश आहे.

यातील जातेगावकर यांच्या अर्जातील अनुमोदकाच्या नावात फरक आढळल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. आता आठ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. त्यांची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. आठपैकी पाच जणांनी माघार घेतल्यास बिनविरोध निवड शक्य होणार आहे. त्या दृष्टीने शहरात हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. सोमवारी (दि. 22) यासंदर्भात बैठक होणार असल्याचेही कळते. आठपैकी तीन नावांवर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब झाल्यास निवडणूक टळणार आहे. त्यामुळे नाशिकमधील बैठकीत काय निर्णय होतो व त्यानंतर कोण माघार घेते, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागून आहे.