Sun, Nov 18, 2018 08:18होमपेज › Nashik › बागलाण तालुक्यात शेतात आढळले नवजात अर्भक

बागलाण तालुक्यात शेतात आढळले नवजात अर्भक

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:23PM

बुकमार्क करा
लखमापूर : वार्ताहर

सटाणा तालुक्यातील देवळाणे-कर्‍हे रस्त्यावरील इच्छामणी गणपती मंदिराजवळ चार तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

स्थानिकांनी तत्काळ जायखेडा पोलीस ठाण्याच्या मदतीने नवजात बालकाला सटाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अर्भकास वाचविण्यात यश आले. जायखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाणे-कर्र्‍हे रस्त्यावर इच्छामणी गणपती मंदिराजवळ युवराज श्रावण काकुळते यांची शेती आहे. संबंधित शेतकरी रात्री आपल्या शेतातील पिकांना पाणी देत होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास विद्युतपंप बंद करून शेतातील घराकडे जाताना त्यांच्याच शेतातील चार्‍याच्या ढिगाजवळून बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ते घाबरले. त्यांनी घरी येऊन कुटुंबीयांना माहिती कळविली व गावातील तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष सुभाष भदाण यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. तसेच पोलीसपाटील अशोक आहिरे यांनाही कळविले. त्यांनी जायखेडा  ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने बालकाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ अमोल पवार यांना बोलविण्यात आले. नवजात बालक चार तासांपूर्वी जन्मलेले असल्याचे यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हुसेन नयनी यांनी सांगितले.

यावेळी रुग्णालयातील प्रवीण देवरे, महेंद्र रौंदळ यांनी सहकार्य केले. नवजात बालकाला त्वरित एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बालकाला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे डॉ. हुसेन नयनी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड घटनेचा तपास करीत आहेत. अनैतिक संबंधातून हा प्रकार  घडला असण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.