Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Nashik › वसुली करताना गय नाही

वसुली करताना गय नाही

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 08 2018 11:25PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी गुरुवारपासून पुन्हा कामकाजाला सुरुवात केली. बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी वसुलीला प्राधान्य देऊ आणि हे करताना कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सहकार आयुक्तांनी घेतला होता. या निर्णयाला संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन दिवसांपूर्वीच बरखास्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. प्रत्यक्ष न्यायालयाचे आदेश मात्र गुरुवारी बँकेला प्राप्त झाले. त्याचदिवशी आहेर यांनी पुन्हा खुर्चीत विराजमान होऊन कामकाजाला सुरुवात केली. बँकेत कामकाज करण्याची पुन्हा संधी मिळाली असून, या संधीचा उपयोग आता बँक ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी करू, असे ते म्हणाले. चुकीच्या कामाला थारा दिला जाणार नाही. बँक ही शेतकर्‍यांची असून, बँकेबद्दल पुन्हा विश्‍वासार्हता निर्माण करू, असा शब्दही त्यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष सुहास कांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार तथा संचालक शिरीष कोतवाल, नरेंद्र दराडे, गणपत पाटील, दिलीप बनकर, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, धनंजय पवार आदी उपस्थित होते.

..अन् खुर्ची बदलली

जवळपास 35 दिवस बँकेत प्रशासक म्हणून मिलिंद भालेराव हे काम पाहत होते. त्यामुळे अध्यक्षांच्या दालनातील खुर्चीत ते काही दिवस तरी विराजमान झाले होते. आता आहेर यांनी पुन्हा अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू करताना मात्र ही खुर्ची बदलून दुसर्‍या खुर्चीत बसणे पसंत केले. खुर्चीसाठी कधी मंत्रालयाच्या पायर्‍या झिजविण्यात आल्या तर प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यात आली. त्यामुळे खुर्चीचे महत्त्वही यानिमित्ताने अधोरेखित झाले.

लेखाधिकार्‍यांनी घेतली जिल्हा बँक  अध्यक्षांची भेट

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराला सुरुवात करताच जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या लेखाधिकार्‍यांनी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांची भेट घेत अडकलेले पैसे परत करण्याचे साकडे घातले. आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन सगळ्याच लेखाधिकार्‍यांना देण्यात आले. नोटाबंदीचा निर्णय तसेच कर्जमाफी या प्रमुख कारणांमुळे जिल्हा बँकेची आर्थिकस्थिती दरम्यानच्या काळात प्रचंड खालावली होती. दैनंदिन व्यवहारासाठीही बँकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने सगळ्याच घटकांचे पैसे बँकेत अडकले होते. यात जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक योजना, ग्रामपंचायत निधी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या देयकांचाही समावेश होता. प्रत्येक तालुक्याचे जवळपास साडेतीन कोटी रुपये असल्याने योजनाही ठप्प झाल्या आहेत. दरम्यान, संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर केदा आहेर यांनी गुरुवारपासून कामकाजाला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी पंचायत समित्यांच्या सगळ्याच लेखाधिकार्‍यांनी आहेर यांची भेट घेत अडकलेले पैसे परत करण्याची विनंती केली. आहेर हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून, त्यांच्या सौभाग्यवती धनश्री आहेर विद्यमान सदस्य आहेत.