Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाट्य परिषद : नाशिकच्या तीनही जागा बिनविरोध 

नाट्य परिषद : नाशिकच्या तीनही जागा बिनविरोध 

Published On: Jan 25 2018 1:49AM | Last Updated: Jan 25 2018 1:46AMनाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय नाट्य परिषद नियामक  मंडळासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी  नाशिक शाखेतून बिनविरोध सदस्य देण्याबाबत नाशिकच्या उमेदवारांना यश आले आहे. नाशिक शाखेने सुनील ढगे, चित्रपट दिग्दर्शक सचिन शिंदे व सुरेश गायधनी यांची नावे निश्‍चित केली आहेत. त्यांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याकडे सादर केली जातील. 

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीसाठी नाशिक शाखेतून एकूण आठ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यात सुनील ढगे, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, राजेंद्र जाधव, प्रफुल्ल दीक्षित, गिरीश गर्गे, सचिन शिंदे व नाट्य लेखक दत्ता पाटील यांचा समावेश आहे. तीन जागांसाठी आठ उमेदवार समोरासमोर आल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याच्या मार्गावर होती. परंतु, आठही उमेदवारांनी कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत समझोता करून ढगे, शिंदे व गायधनी यांच्या नावावर एकमत दर्शविले.

याबाबत नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन, संबंधित तीन नावे जाहीर करत निवडणूक बिनविरोध करण्यात येणार असल्याचे सांगितले. या तीन उमेदवारांची नावे मुंबईत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केली जाणार आहेत. त्यानंतरच खर्‍या अर्थाने या नावांवर शिक्‍कामोर्तब होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाइन पद्धत असल्याने नाशिकमधून कोणी कोणी अर्ज दाखल केले, याबाबत एकमेकांना खबरच नव्हती. आधी तीनच उमेदवारांनी अर्ज केले होते.

परंतु, आणखी पाच उमेदवार असल्याची माहिती मिळताच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याबाबत ढगे यांनी संबंधित उमेदवारांनी अर्ज दाखल करत असल्याचे सांगितले असते, तर आम्ही आमचे अर्जच दाखल केले नसते असे सांगत या विसंवादाविषयी नाराजी व्यक्‍त करत येत्या काळात नाट्य परिषदेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही तिन्ही उमेदवार पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.