Thu, Apr 18, 2019 16:23होमपेज › Nashik › राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांना सोबत घेणार

राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांना सोबत घेणार

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

विरोधक एकत्र येऊ नये म्हणून भाजपा प्रयत्नशील आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय काँगे्रस धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांना एकत्र आणून आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

दोनदिवसीय नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या कारभारावर तोफ डागताना ते म्हणाले की, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्‍वासन देऊन सरकार सत्तेत आले. पण, पावसाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. सिडकोसाठी 24 एकरचा भूखंड बिल्डरला साडेतीन कोटी रुपयांमध्ये विकला गेला. यातील अनियमितता बाहेर काढल्यावर मुख्यमंत्र्यांना करार रद्द करावा लागला. अधिकारी, बिल्डर या सोनेरी टोळीची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णयही घ्यावा लागला. कर्जमाफीचा घोटाळाही बाहेर काढण्यात आला. केंद्र सरकारवरील अविश्‍वास ठरावाच्या निमित्ताने राफेल विमान खरेदीचा प्रस्ताव चर्चेत आणला. या खरेदीत 35 ते 36 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता आहे.

शेतमालाला हमीभाव, रोजगाराचे प्रश्‍न महत्वाचे असताना बुलेट ट्रेनसारखे अनाकलनीय निर्णय सरकार घेत आहे. नाशिकमध्ये या सरकारच्या काळात एकही नवीन प्रकल्प आला नाही. कामे दिसून येत नाही. बेरोजगारीचाही प्रश्‍न आहेच. उत्तर प्रदेशात बसप आणि सप एकत्र आल्यानंतर भाजपाला धक्का बसला. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्रातही काँग्र्रेस पक्ष राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. अन्य समविचारी पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. राष्ट्रवादीशी जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. दुसरीकडे भाजपा मात्र विरोधक एकत्र येणार नाही, मतांचे धु्रवीकरण होईल आणि पुन्हा सत्ता हस्तगत करता येईल, यादृष्टीने रणनिती आखत आहे. पण, हुकूमशाही राजवट संपविणे आणि लोकशाही वाचविणे, हेच काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. 

या संघटनांना राजाश्रय कोणाचा 

नालासोपारा येथून सनातन संस्थेच्या वैभव राऊत यास अटक करण्यात आली. त्याच्या घरातून 20 देशी बॉम्ब जप्त करण्यात आले. यावर चव्हाण यांनी सनातन संस्थेवर बॅन लावा म्हणून आपण मुख्यमंत्री असताना केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता, असे सांगितले. त्यावेळी दाभोलकरांची हत्या झालेली नव्हती. सनातनच्या पोटात अनेक संघटना दडल्या असून, सरकारने या संघटनांना राजाश्रय नेमका कोणाचा हे शोधून काढले पाहिजे. भीमा-कोरेगावची दंगल उसळल्यानंतर संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी आम्ही त्यावेळी केली होती. शिवप्रतिष्ठान संघटनाही युवकांना भडकविण्याचे काम करीत असून, आता तरी त्यांना अटक करणार का, असा प्रश्‍न चव्हाण यांनी उपस्थित केला. जे काही पुरावे हाती लागले, त्या आधारे सरकारने अशा संघटनांवर बंदी घातली पाहिजे. 

आरक्षण देण्यास अपयश

मराठा आरक्षणासाठी राज्यभर जे काही मोर्चे निघाले ती परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले. धनगर समाजालाही आरक्षण देण्याचे आश्‍वासन बारामतीत दिले होते. मग, हे आश्‍वासन अभ्यास न करता दिले होते का, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी होत आहे, यावर ते म्हणाले की आमचे सरकार असताना समाजाला सोळा तर मुस्लिम समाजाला पाच टक्के देण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले तेव्हा आताच्या सरकारने आपली बाजू भक्कमपणे मांडायला पाहिजे होती. पण, तसे झालेच नसल्याचा आरोप करण्यात आला.  

नोटाबंदीचा फायदा भाजपाला

नोटाबंदीचा फायदा भाजपाच्याच नेत्यांना झाला. स्वीस बँकेत दोन वर्षांत ठेवींमध्ये वाढ झाली. मग, काळा पैसा बाहेर आला का, दहशतवादी हल्ले थांबले का, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. जुन्या किती नोटा जमा झाल्या हे सांगायला, सरकार नाही. म्हणजे यात नक्कीच काही तरी काळेबेरे आहे. कृषी विकास दरात वाढ झाली नाही. हा विकास दर 8.3 टक्क्यांनी घसरला. औद्योगिक विकासदरही खाली आला आहे, असेही ते म्हणाले.