Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Nashik › नाथांच्या दर्शनाने वारकरी कृतकृत्य!

नाथांच्या दर्शनाने वारकरी कृतकृत्य!

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 11:22PM

बुकमार्क करा
नाशिक : गौरव जोशी

ब्रह्मगिरीच्या साक्षीने टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी त्र्यंबक नगरी शुक्रवारी (दि. 12) दुमदुमून गेली होती. संत परंपरेचे आद्यपीठ असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेल्या वारकर्‍यांनी येते वर्ष सुखाचे, समाधानाचे जावो, असे साकडे घातले. दरम्यान, मुख्य पालख्या व दिंडी शनिवारी (दि.13) द्वादशीचा उपवास सोडून मार्गस्थ होतील.

यंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने तसेच पिकेही जोमात आल्याने बळीराजा सुखावला आहे. निवृत्तिनाथ महाराज वारीत त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. पौष वारीचे निमित्त साधत यंदा राज्यभरातून आलेल्या पाच लाख भाविकांनी निवृत्तिनाथांच्या चरणी माथा टेकवला. तसेच, सायंकाळी जीवा आणि शिवाची भेट सोहळा ‘याची देही याचि डोळा’ अनुभवला. सायंकाळी दुरवरच्या पालख्या व दिंड्यांनी परतीच्या मार्गाला लागल्या. 

पौष वारीसाठी यंदा दोन ते अडीच लाख भाविक येतील अशी अटकळ त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका प्रशासनाने बांधली होती. मात्र, ऐनवेळी हीच वारकर्‍यांची गर्दी दुप्पट झाल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले पहायला मिळाले. व्यावसायिकांनी जागा मिळेल तेथे दुकाने थाटली होती. वारीत यंदा चांगला व्यवसाय झाला असून, गेल्या तीन दिवसात त्र्यंबकेश्‍वरमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली.

निवृत्तिनाथांच्या कृपेने व्यवसाय चांगला झाल्याने व्यावसायिकांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होते. वारीतील मुख्य दिवस म्हणजे शुक्रवारी (दि.12) निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा तसेच, सायंकाळी रथयात्रेचे क्षण डोळ्यात साठवून अनेक पालख्या व दिंड्या परतीच्या मार्गाला लागल्या. मुख्य पालख्या व दिंड्यांमधील वारकरी हे शनिवारी (दि. 12) द्वादशीचा उपवास सोडून मगच आपापल्या गावाकडे परततील. 

वारीमुळे प्रशासनाने त्र्यंबकेश्‍वर शहराबाहेरील महामार्गावरील बसस्थानकातून बस सोडण्यात येत होते. एसटी प्रशासनाकडून दर मिनिटाला एक याप्रमाणे बस सोडण्यात येत होत्या. त्र्यंबकेश्‍वरमधूनच जिल्ह्यातील विविध भागांसह मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर भागांसाठी बसेस सोडण्यात येत होत्या. त्यामुळेच घरी परतणार्‍या वारकर्‍यांची गैरसोय टळली.