Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Nashik › नाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे 

नाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे 

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 12 2017 11:52PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने ‘स्मार्ट नाशिक’ आणि ‘स्वच्छ अ‍ॅप’ या दोघांचे एकत्रीकरण केले आहे. या दोन्ही अ‍ॅपच्या वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाल्याने ‘स्मार्ट स्वच्छ नाशिक अ‍ॅप’ची रँक 282 वरून 72 वर पोहोचली आहे. केंद्र शासनाकडून ही रँक ठरविली जाते. नाशिकची क्रमवारी वरच्या स्थानी पोहोचल्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

येत्या 4 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत नाशिक शहराचे स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी नाशिक मनपाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांकडून स्वच्छतेविषयी अधिकाधिक समस्या व तक्रारी मांडाव्यात, यासाठी स्वच्छ अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचे मनपा प्रशासनाने स्मार्ट नाशिक अ‍ॅपशी एकत्रीकरण केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या अ‍ॅपबाबत केंद्र शासनाकडून क्रमवारी जाहीर केली जाते. नाशिकच्या अ‍ॅपची यूजर संख्या 33 हजारांवर पोहोचल्याने मनपाची रँक 72 वर पोहोचली आहे. स्मार्ट नाशिक अ‍ॅपच्या यूजर्सनी स्वच्छ अ‍ॅपला लिंक केल्याने या क्रमावारीत वाढ झाली आहे.  स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन प्रकारात घनकचरा व्यवस्थापन, खत डेपोवरील सीसीटीव्ही, ऑटो वे ब्रिज, वेस्ट टू एनर्जी आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून, जास्तीत जास्त कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपनी व आरसीएफ यांच्यात झालेल्या करारानुसार खत डेपोत उत्पादित झालेले खत आरसीएफ कंपनीकडूनच विकत घेतले जात आहे. त्याचबरोबर इतर उरलेल्या घनकचर्‍यातून तयार झालेला भुसभुशीत माल (फ्लप) याच कंपनीकडून घेतले जात असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. शहरात वैयक्तिक लाभाच्या 7264 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, 20 ठिकाणी कम्युनिटी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहराची स्वच्छतेबाबतची स्थिती अधिक चांगली असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले.