नाशिक :वार्ताहर
जिल्हा परिषद सदस्यांना अपमानास्पद वागणूक आणि अरेरावी करणार्या लघु पाटबंधारे विभागाच्या पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्यास सीईओंनी हात झटकले आहे. कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नसून शासनाचा असल्याचे त्यांनी सांगीतले. थेट कारवाईच्या अगोदर ‘कारणे दाखवा नोटीस’ वाघमारे यांना सीईओ दीपककुमार मीना यांनी बजावली. मात्र, ठोस कारवाईसाठी शासनाकडेच बोट करून अंग झटकले आहे. जिल्हा परिषदेच्या ल.पा.पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकात वाघमारे यांनी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांच्याशी केलेली अरेरावीचे पडसाद, जिल्हा परिषदेत उमटले.
वाघमारे यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शंकर धनवटे, कावजी ठाकरे, धनराज महाले यांनी सीईओ दीपककुमार मीना यांना पत्र देऊन दिले. महिला बाल कल्याण समिती सभापती, रुपांजली माळेकर आणि स्वतः शिरसाठ यांनीही वाघमारे यांची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्यासह सीईओं मीना यांच्याकडे केलेली होती. त्याचबरोबर आज अध्यक्षा सांगळे सीईओंना पत्र देणार होत्या. ल.पा.पश्चिमचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी पूर्वीही सदस्य, पदाधिकारी यांच्याबरोबर वाद घातले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित यांच्या कक्षेत त्यांनाच उलट बोलण्याची मजल वाघमारे यांनी मारली होती. त्यावेळी उपाध्यक्षा आणि वाघमारे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.
मात्र, अध्यक्षा आणि सीईओंच्या मध्यस्थीने हे प्रकरण नंतर शमले होते. मात्र, आता पुन्हा जि.प.सदस्य शिरसाठ आणि वाघमारे यांच्यात झालेल्या वादाच्या घटनेने वाघमारे यांच्या बेशिस्त वर्तनाची लक्तरे जि.प.च्या वेशीवर टांगली गेली आहे. त्यामुळे यावेळी सदस्यांसह जि.प. पदाधिकार्यांनीही वाघमारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीईओ यांच्यासह विभागीय महसूल आयुक्तांवर दबाव आणला आहे.