Mon, Apr 22, 2019 11:50होमपेज › Nashik › महिला बालकल्याण समितीचा सत्तारूढ पक्षाला घरचा आहेर

महिला बालकल्याण समितीचा सत्तारूढ पक्षाला घरचा आहेर

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

वर्षभरापासून झालेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याने तसेच काही उपक्रम अधिकारी सदस्यांना विश्‍वासात न घेता परस्पर राबवित असल्याने संतप्‍त झालेल्या मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. येत्या दोन महिन्यांत सर्व ठरावांवर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. सत्ता असूनही समितीच्या सदस्यांसह सभापतींना आंदोलन करावे लागल्याने हे आंदोलन म्हणजे सत्तारूढ पक्षाला घरचाच आहेर ठरला. महिला बालकल्याण समितीची सभा सभापती सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत अंगणवाडी सेविकांचे ओळखपत्र, अंगणवाड्यातील स्वच्छतागृहे, महिलांना वाहन प्रशिक्षण, महिला समुपदेशन केंद्र, सकस आहार, महिला प्रशिक्षण, महिला आरोग्य तपासणी अशा विविध विषयांवर झालेल्या ठरावांबाबत सदस्यांनी विचारणा केली.

त्यावर महिला बालकल्याण विभागातील अधिकार्‍यांकडून योग्य व समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. संबंधित ठरावांविषयी कार्यवाही सुरू असल्याचेच उत्तरे अनेक सभांमध्ये अधिकार्‍यांकडून मिळत असल्याने संतप्‍त झालेल्या सदस्य सत्यभामा गाडेकर, शीतल माळोदे, पूनम मोगरे, कावेरी घुगे, नयना गांगुर्डे, समिना मेमन यांनी सभागृहाच्या हौदात उतरून ठिय्या आंदोलन केले. अडीच ते तीन तास हे आंदोलन चालले. महिला आरोग्य तपासणीविषयी सभापती अहिरे यांनी विचारणा केली असता सहाही विभागांत हे शिबिर घेण्यात आल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. त्यावर याबाबत सभापती वा सदस्यांना माहिती कळवावी असे का वाटले नाही असा प्रश्‍न उपस्थित केला असता अधिकार्‍यांनी मौन पाळले.

तर दुसरीकडे 26 जानेवारीला अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बिस्कीट पुड्यांऐवजी शालेय दप्तर देण्याचा ठराव करण्यात आला होता. असे असताना अधिकारी व कर्मचार्‍यांनी मात्र बिस्कीट पुड्यांचेच वाटप केल्याचे निदर्शनास आल्याने सभापती अहिरे यांनी कर्मचार्‍यांना फैलावर घेतले. ठराव करून आणि आदेश देऊनही कामे होत नसतील तर महिला समिती बरखास्त करा, असे सांगत वरिष्ठांनी  तल्यानंतरच कामे होत असतील तर सदस्यांचे अधिकार काय असा प्रश्‍न सत्यभामा गाडेकर व समिना मेमन यांनी उपस्थित केला.  सभापती अहिरे यांनी आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांना आंदोलन व अधिकारी ठरावांची अंमलबजावणी करत नसल्याची तक्रार केली. त्यावर आयुक्‍तांनी उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांना पाठविले. त्यांनी येत्या दोन महिन्यांतच दहा ठरावांची कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिल्याने सदस्यांनी आंदोलन मागे घेतले.