Tue, Apr 23, 2019 06:03होमपेज › Nashik › हेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार

हेलिकॉप्टर्स उभारणीत मदत करणार

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 12:03AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

आधुनिक हलक्या दर्जाच्या हेलिकॉप्टर्स उभारणी क्षेत्रात काम करणार्‍या भारतीय कंपन्यांचे उत्पादन जागतिक स्तरावर  पोहोचवण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) मदतीचा हात देणार आहे. या हेलिकॉप्टर्सच्या जोडणीबरोबरच त्याची गॅरंटी आणि वॉरंटीची जबाबदारी एचएएलची असेल, असे प्रतिपादन एचएएलचे अध्यक्ष टी. सुवर्णा राजू यांनी केले.

ओझर येथील एचएएल टाउनशिपमध्ये शनिवारी (दि.9) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) समिट 2017  कार्यक्रम पार पडला. त्यानंतर राजू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतीय वायुसेनेसाठी लढाऊ विमानांबरोबरच आधुनिक हलक्या स्वरूपाची हेलिकॉप्टर्स तयार केली आहे. 14 आसनी क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टर्सचे आर्युमान दोन लाख तास उड्डाणाचे आहे. आतापर्यंत 200 हेलिकॉप्टर्स वायुसेनेला देण्यात आली असून, आणखी 100 हेलिकॉप्टर्स तयार करण्याचे काम सुरू असल्याचे राजू यांनी स्पष्ट केले.

देशांतर्गत हेलिकॉप्टर्स क्षेत्रात काम करणार्‍या अनेक कंपन्या आहेत. परंतु, योग्य मार्गदर्शन आणि मार्केटिंगचे तंत्र अवगत नसल्याने या कंपन्यांना त्यांचा कारभार जागतिक स्तरावर नेणे शक्य होत नाही. अशा कंपन्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. या कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञान तसेच हेलिकॉप्टर्सचे पार्ट्स् उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविल्यास एचएएलच्या कारखान्यात त्याची बांधणी केली जाईल. तसेच या हेलिकॉप्टर्सला उड्डाणाची परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी एचएएल पार पाडेल, असेल टी. राजू यांनी स्पष्ट केले. एचएएलची साथ लाभल्याने भारतीय कंपन्यांना हेलिकॉप्टर्स विक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली होईल, असा विश्‍वास राजूंनी व्यक्त केला. तसेच कंपन्यांना विक्रीचे तंत्र अवगत करण्याबरोबरच त्याच्या विक्रीसाठीही मदत करण्याचे आश्‍वासन टी. राजू यांनी दिले.