Wed, Jul 17, 2019 08:12



होमपेज › Nashik › माजी मंत्री घोलप यांना एक लाखाचा गंडा

माजी मंत्री घोलप यांना एक लाखाचा गंडा

Published On: Mar 06 2018 2:01AM | Last Updated: Mar 06 2018 1:59AM



नाशिकरोड : वार्ताहर

माजी समाजकल्याण व सामाजिक न्यायमंत्री बबन घोलप यांना व्हीआयपी मोबाइल क्रमांक आणि आयफोनच्या नावाखाली एक लाख 33 हजार 120 रुपयांना गंडा घातला आहे. भारती एअरटेल कंपनी जयपूर यांच्या नावाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नोव्हेंबर 2017 मध्ये कंपनीतर्फे व्हीआयपी क्रमांक आणि आयफोन एक्स भ्रमणध्वनी दिला जाणार आहे, असे एअरटेल या कंपनीकडून माजी मंत्री बबन घोलप यांना भ्रमणध्वनीवर सांगण्यात आले.  

यासाठी जीएसटीसह एक लाख 33 हजार 120 रुपयांची रक्कम आम्ही दिलेल्या बँकेच्या खात्यात जमा करावी लागेल, असे संबंधित व्यक्‍तीने त्यांना सांगितले. त्या प्रमाणे  भारती एअरटेल एन्टरप्राइजेसच्या  418105500041 या खात्यामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2017 रोजी 50 हजार रुपये आरटीजीएसद्वारे घोलप यांनी जमा केले. यानंतर संतोष राठोड या व्यक्‍तीच्या कोटक महिंद्रा बँक, जयपूर, वैशालीनगर शाखेत  2812012325 या क्रमांकाच्या खात्यात दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी 54 हजार त्याचप्रमाणे दि. 14 नोव्हेंबर रोजी 29,150 रुपये भरले. एकूण एक लाख 33 हजार 120 रुपयांचा भरणा संबंधित व्यक्‍तीने सुचविलेल्या खात्यामध्ये घोलप यांनी  केला. 

भरणा केल्यानंतर दि. 20 नोव्हेंबर 2017 रोजी ‘तुम्ही व्हीआयपी क्रमांकाचे सिम आणि आयफोन डिलक्स हॅण्डसेट नाशिक येथील भारती एअरटेल लि. कॉर्पोरेट, सिद्धी पार्क, मनोरथ हॉटेल समोर, राजीव गांधी भवन शेजारी येथून घेऊन जावे’, असा संदेश घोलप यांच्या भ्रमणध्वनीवर आला. त्याप्रमाणे माजी मंत्री घोलप हे संबंधित ठिकाणी गेले.

त्यावेळी येथे भारती एअरटेल नावाच्या कंपनीचे कार्यालय अस्तित्वात नसल्याचे निदर्शनाला आले. यानंतर घोलप यांनी कंपनीने दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता कोणीही फोन उचलला नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर घोलप यांनी  भारती एअरटेल कंपनीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.