Sat, May 25, 2019 22:58होमपेज › Nashik › दिंड्यांचा परतीचा प्रवास सुरू

दिंड्यांचा परतीचा प्रवास सुरू

Published On: Jan 14 2018 2:16AM | Last Updated: Jan 14 2018 2:09AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

द्वादशीचा उपवास सोडून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महारांच्या चरणी लीन होत वारकर्‍यांनी पुढील वर्षी पुन्हा वारीला येण्याची खुणगाठ मनाशी बांधत त्र्यंबकनगरीचा निरोप घेतला. प्रमुख दिंड्या व पालख्यांनीही नाथांच्या चरणी सेवा अर्पण करत प्रस्थान ठेवले. पौषवारीच्या निमित्ताने तीन दिवसांपासून त्र्यंबकनगरीत वैष्णवांचा मेळा भरला होता. वारकर्‍यांनी शुक्रवारी (दि. 12) वारीच्या मुख्य दिवसाचे औचित्य साधत निवृत्तिनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले.

वारीच्या तिसर्‍या दिवशी द्वादशीला उपवास सोडत वारकर्‍यांनी परतीचा मार्ग धरला. यावेळी वारकर्‍यांनी एकमेकांना अलिंगन देऊन पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचा निश्‍चय केला. दरम्यान, मानाच्या तसेच मुख्य पालख्या व दिंड्यांनीही शनिवारी दुपारनंतर त्र्यंबकनगरीतून प्रस्थान केले. दरम्यान, गावी परतणार्‍या भाविकांमुळे त्र्यंबकेश्‍वर महामार्ग फुलून गेला.  वारीतील अनेक भाविकांनी गावी जाण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर शहराबाहेरील महामार्ग बसस्थानकावरून बस पकडण्यास पसंती दिली. तर बर्‍याच भाविकांनी त्र्यंबकहून नाशिकला येत पुढे गावी जाण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळेच शहरातील ठक्कर बसस्थानकासह मेळा, जुने सीबीएस तसेच महामार्ग बसस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले होते.