होमपेज › Nashik › न्याय हक्कासाठी आदिवासींची एकजूट गरजेची

न्याय हक्कासाठी आदिवासींची एकजूट गरजेची

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 08 2018 11:04PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण आदिवासी समाज करत आला आहे. परकीय आक्रमणांविरोधात आदिवासींनी उठाव केला. परंतु, इतिहासकारांनी त्यांचा इतिहास कायम दुर्लक्षित ठेवला. स्वातंत्र्यानंतरही आदिवासींच्या नशिबी उपेक्षाच आली. न्याय हक्काच्या लढाईसाठी आदिवासींची एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत आदिवासी अभ्यासक शिवाजी ढवळे यांनी केले. आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटनेच्या वतीने आयोजित आदिवासी सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यशवंतराव महाराज पटांगणावर रविवारी (दि.7) सायंकाळी हा सोहळा पार पडला. यावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते. यावेळी ढवळे यांच्या हस्ते समाजासाठी कार्य  करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ढवळे म्हणाले, देशाचा मूळ नागरिक असलेला आदिवासी समाज आज एकवेळच्या जेवणासाठी झगडतो आहे. त्याचे जगण्याचे सर्व हक्क, साधने हिसकावण्यात आली आहेत.

यामुळे शिक्षण प्रवाहापासून ते दूर आहेत. संविधानाने देऊ केलेले समता, न्याय व बंधुत्व या संधी मिळण्यासाठी आपल्या स्वायत्त हक्कांसाठी सर्व आदिवासींनी अंतर्गत पोटजाती विसरून एक व्हावे लागेल, असे त्यांनी सांगितले. खासदार चव्हाण म्हणाले, आदिवासींचे हक्क, त्यांच्या वन जमिनी त्यांना मिळाव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आदिवासींनी एकजूट दाखविल्यास समस्या मार्गी लागणे शक्य होईल. यावेळी आमदार सानप व महापौर भानसी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.