Wed, Feb 26, 2020 09:17होमपेज › Nashik › शौचालय अनुदानापोटी ३२ लाख रुपयांची वसुली

शौचालय अनुदानापोटी ३२ लाख रुपयांची वसुली

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 2:02AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियांतर्गत वैयक्तिक शौचालयांचे अनुदान खर्च न केलेल्या शहरातील 533 लाभार्थ्यांकडून मनपाने 32 लाख 46 हजार रुपये वसूल केले आहेत. मनपाने आतापर्यंत शहरात 7264 इतकी वैयक्तिक शौचालये उभारली आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात उघड्यावर शौचास बसणार्‍या तसेच शौचालये नसणार्‍या कुटुंबांचा शोध घेण्यात आला. त्यानुसार मनपा सर्वेक्षणात आढळून आलेल्या सुमारे आठ हजार कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून प्रत्येकी 12 हजार रुपये वितरित केले. एकूण लाभार्थ्यांपैकी 7264 कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापरही सुरू केला.

परंतु, अनुदान देऊनही शौचालये न बांधणार्‍या नागरिकांना मनपाने नोटीस देऊन अनुदान पुन्हा मागितले होते. मात्र, घेतलेले अनुदान परत करताना अनेक लाभार्थ्यांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे मनपाने अशा लाभार्थ्यांना कारवाई करण्याचा इशारा देताच संबंधितांनी अनुदान परत केेले आहेत. त्यात 533 पैकी 525 कुटुंबांनी प्रत्येकी सहा हजार परत केले असून, एकूण 31 लाख 50 हजार रुपये तर आठ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 12 हजार अशी 96 हजारांची रक्कम वसूल केली आहे. महापालिका हद्दीत अजूनही अनेक लोक उघड्यावर शौचास बसतात. यामुळे प्रदूषण तर होतेच शिवाय स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर होण्यालाही अडथळे निर्माण होत आहेत. मनपाने 31 पैकी बहुतांश सर्वच प्रभाग हागणदारीमुक्त घोषित केले असले तरी अजूनही त्यात पूर्णपणे यश मिळालेले नाही.