Sat, Mar 23, 2019 18:42होमपेज › Nashik › टिप्पर गँगच्या गुंडांना आठ वर्षांचा तुरुंगवास

टिप्पर गँगच्या गुंडांना आठ वर्षांचा तुरुंगवास

Published On: Feb 21 2018 11:16PM | Last Updated: Feb 21 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून सुमारे एक कोटी रुपयांची लूट करणार्‍या सिडकोतील कुख्यात टिप्पर गँगच्या नऊ जणांना विशेष मोक्‍का न्यायालयाने दोषी ठरवत आठ वर्षांची शिक्षा व मोक्काच्या वेगवेगळ्या कलमान्वये प्रत्येकी पंधरा लाख रुपये दंडाची सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी तिघा जणांची मुक्‍तता केली आहे. यामध्ये टिप्पर गँगचा म्होरक्या गणेश सुरेश वाघ उर्फ गण्या कावळे यासह समीर नासीर पठाण, नागेश भागवत सोनवणे, नितीन बाळकृष्ण काळे, अनिल पंडित आहेर, सुनील दौलतराव खोकले, सागर जयराम भडांगे, सोनल उर्फ लाल्या रोहिदास भडांगे, सुनील भास्कर अनार्थे यांचा समावेश आहे. विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी (दि.21) ही शिक्षा सुनावली. मोक्‍कान्वये कारवाई होण्याची ही दुसरी घटना ठरली असून, या शिक्षेमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

सहा वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या सिडको परिसरातील यश आर्केड, शिल्पा स्टॉक ब्रोकरसमोरील कार्यालयात घडलेल्या लुटीच्या प्रकरणानंतर अंबड पोलिसांनी टिप्पर गँगच्या 12 जणांवर एप्रिल 2013 मध्ये मोक्‍कान्वये कारवाई केली होती. सिडको परिसरासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये टिप्पर गँगच्या काही सदस्यांविरोधात हत्या, खंडणी, चेन स्नॅचिंग, लूटमार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तुरुंगातूनही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होत्या. तत्कालीन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी टिप्पर गँगवर मोक्का लावला होता. या प्रकरणी दोषींवर 970 पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या अगोदर पोलिसांनी परदेशी गँगवर दोनदा मोक्‍का लावला होता. मात्र,  न्यायालयात सबळ पुराव्यांअभावी हा मोक्‍का टिकू शकला नाही.

सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता एस. एस. कोतवाल यांनी कामकाज पाहीले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ढिकले, थोरात, बागूल, सुळे, शिंदे, माळोदे यांनी या गुन्ह्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. दरम्यान,  यापैकी चार संशयितांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविला होता. तर उर्वरित आठ संशयित गेल्या सहा वर्षांपासून नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यांनी सुमारे सहा वर्षे शिक्षा पूर्ण केली आहे. त्यांची ही सहा वर्षे वगळून उर्वरित दोन वर्षे शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे. तसेच दंडाची रक्‍कम न भरल्यास शिक्षेमध्ये एक वर्षाची वाढ होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.