Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Nashik › ‘मल्टिप्लेक्स’मध्ये प्रेक्षकांची कोंडी

‘मल्टिप्लेक्स’मध्ये प्रेक्षकांची कोंडी

Published On: Dec 11 2017 1:59AM | Last Updated: Dec 11 2017 1:36AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांतील बेकायदा खाद्यपदार्थ बंदीविरोधात जनमत एकवटत असून, यासंदर्भात राजकीय पक्ष, चित्रपट महामंडळ, राज्य ग्राहक कल्याण समिती आदींनी पावले उचलण्यास सुुरुवात केली आहे. मल्टिप्लेक्स चालकांची मुजोरी मात्र अद्याप कायम असून, यासंदर्भात स्थानिक पातळीवर आपण काही करू शकत नसल्याचा हेका त्यांनी लावून धरला आहे. 

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांत प्रेक्षकांना घरचे खाद्यपदार्थ प्रेक्षागृहात नेऊ दिले जात नाहीत. तेथील कर्मचार्‍यांकडून प्रेक्षकांची तपासणी केली जाते. प्रेक्षकांकडे खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली असल्यास त्यांची अडवणूक केली जाते. एकीकडे प्रेक्षकांना घरून खाद्यपदार्थ आणू दिले जात नसताना, दुसरीकडे मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ व पेयांची जवळपास दुप्पट दराने विक्री केली जाते व हे पदार्थ बिनदिक्कतपणे आत नेले जाऊ देतात. ही ग्राहकांची फसवणूक व लूट असून, हा विषय यापूर्वीही वारंवार चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांचा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. चित्रपटगृहांमध्ये घरचे खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाही. असा मज्जाव करणे कायद्याने गैर असून, यासंदर्भात नागरिकांची अडवणूक होत असल्यास संबंधित कर्मचार्‍याला नियम विचारावा. तरीही दाद न मिळाल्यास ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन या संदेशात करण्यात आले आहे. यासंदर्भात येत्या 15 दिवसांत प्रत्येक चित्रपटगृहाच्या दर्शनी भागावर फलक लावण्यात येणार आहे, असेही या संदेशात म्हटले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेही कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रार केली आहे. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ नेऊ द्यायचे की नाही, हा संबंधित मालकाचा प्रश्‍न असला, तरी पॉपकॉर्न व अन्य खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्यांची किंमत दुपटीने वसूल केली जात असून, हा ग्राहकांवरील अन्याय आहे. यासंदर्भात मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे भोसले म्हणाले. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सिटी सेंटर मॉलमधील चित्रपटगृह व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले असून, चित्रपटगृहात घरचे खाद्यपदार्थ नेऊ देण्यास परवानगी द्यावी, असे त्यात म्हटले आहे. तुषार जाधव, विद्यासागर घुगे, महेश गायकवाड, ज्ञानेश्‍वर जायभावे, सिद्धेश गांधी, प्रवीण पानगव्हाणे, अभिजित संगमा आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले. 

राज्य ग्राहक कल्याण समितीतर्फेही यासंदर्भात जागृती सुरू आहे. चित्रपटगृहे वा नाट्यगृहांत खाद्यपदार्थ नेऊ न देण्यात फारसे चुकीचे नाही. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ही अट योग्य असली, तरी तेथून वाढीव दराने खाद्यपदार्थ घेऊन ते खाण्यास मात्र आक्षेप घेतला जात नाही, हा शुद्ध ढोंगीपणा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी पुरवठा विभागाकडे तक्रार करावी. राज्य ग्राहक कल्याण समितीकडेही पुराव्यासह तक्रार दिल्यास पाठपुरावा केला जाईल, असे सांगण्यात आले. 

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ बंदीचा विषय चर्चेत असताना, चित्रपटाच्या प्रिंटवरूनही वाद निर्माण झाला आहे. नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी यासंदर्भात फेसबुकवर आवाज उठवला आहे. ‘पीव्हीआर’मध्ये ‘तुम्हारी सुलू’ चित्रपटाची प्रिंट 70 ऐवजी 35 एमएमची व अत्यंत धुरकट, तांबूस दिसत होती; मात्र त्याविषयी व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मल्टिप्लेक्स चालकांनी मात्र या सर्व तक्रारींविरोधात हात वर केले असून, संकेतस्थळावरून फोन नंबर घेऊन मुख्य कार्यालयात तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या कोंडीत भरच पडल्याचे चित्र आहे.