होमपेज › Nashik › ‘बॉश’ फसवणूक प्रकरणी मुख्य संशयिताला अटक 

‘बॉश’ फसवणूक प्रकरणी मुख्य संशयिताला अटक 

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:47PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

बॉश कंपनीतील सुटे पार्ट्स चोरी करून त्याची विक्री करणार्‍या आणि सिडकोतील पंडितनगर परिसरातील एका इमारतीत कंपनी सुरू करून नव्याने स्पेअर पार्ट्स बनवून कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीतील मुख्य संशयित छोटू चौधरी यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.10) पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमारे पाच वर्षांपासून या टोळीने बॉश कंपनीतील स्क्रॅप साहित्य चोरल्याचा संशय आहे. त्याचप्रमाणे पंडितनगर येथील तीन मजली इमारतीत कंपनी सुरू करून बॉश कंपनीत बनणार्‍या साहित्याचे बनावटीकरण करण्यास सुरुवात केली होती. हे साहित्य पंजाब, दिल्लीसह इतर भागांतही विकले आहेे.

याची कुणकुण अंबड पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून शिश अहमद अस्लम हुसेन खान (21, रा. अंबड लिंकरोड) आणि अहमद रजा शुभराजी खान (18, रा. संजीवनगर) या दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांनाही बुधवारपर्यंत (दि.10) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि बॉश कंपनीचा ठेकेदार छोटू चौधरी पसार झाला होता. पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशमधील इंदूर येथून ताब्यात घेतले.