होमपेज › Nashik › वाळू चोरी रोखण्यासाठी पथके तयार करा : खेडकर

वाळू चोरी रोखण्यासाठी पथके तयार करा : खेडकर

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:31PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

उच्च न्यायालयाने वाळू घाटांच्या लिलावावर बंदी घातली आहेे. या निर्णयामुळे वाळू चोरीचे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने तालुकानिहाय पथके तयार करून त्यावर नियंत्रण ठेवा. तसेच एखाद्या ठिकाणी छापा टाकताना पोलिसांची मदत घ्या, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी तहसीलदारांना दिले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 38 टक्के वसुली झाली आहे. दोन महिन्यात उर्वरित वसुलीची टांगती तलावर प्रशासनावर आहे. 

जिल्ह्यातील वसुलीबाबतचा आढावा घेण्यासाठी खेडकर यांनी सर्व तहसीलदारांची सोमवारी (दि.8) बैठक घेतली. जीएसटीमुळे यंदा करमणूक कर गोळा करण्याचे अधिकार गेल्याने प्रशासनासमोर कोंडी निर्माण झाली आहे. त्यातच पर्यावरणाचे निकष पाळले जात नसल्याचे कारण देत उच्च न्यायालयाने वाळू घाटांच्या लिलावावर बंदी घातली आहे. परिणामी जिल्ह्यातील 48 घाटांच्या लिलावांसाठी पुढील आदेश येईपर्यंत प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाळू घाटांच्या लिलावाला बंदी आल्याने वाळू माफियांकडून चोरीचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात पथके तैनात करण्यात यावी. तसेच वाळू घाटांना नियमितपणे भेटी देण्याच्या सूचना खेडकर यांनी दिल्या. भेटी देताना सोबत पोलिसांची मदत घेण्यात यावी, असेही खेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला 205 कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात जमीन महसुलचे 100 कोटी तर गौण खनिज विभागाच्या 105 कोटींच्या समावेश आहे.

आजमितीस जिल्ह्याची वसुली 78 कोटी रुपये इतकी झाली आहे. जमीन महसुलची 53 कोटी 13 (53 टक्के) तर गौण खनिजची 24 कोटी 22 लाख (23 टक्के) इतकी वसुली झाली आहे. वसुलीच्या बाबतीत जिल्ह्यात निफाड तळाला आहे. तालुक्यात आजमितीस केवळ 16 कोटी 46 लाखपैकी 1 कोटी 61 लाखांची वसुली झाली आहे. हे प्रमाण 8 टक्के इतके आहे. दुसरीकडे नाशिक तालुक्यात सर्वाधिक 44 कोटींची (56.60 टक्के) वसुली झाली आहे. तालुक्यातला एकुण उदिष्ट 79 कोटी रूपये आहे.