Tue, Jul 23, 2019 07:27होमपेज › Nashik › शिंदे टोलनाक्यावर आता 10 एप्रिलला सेनेचा राडा

शिंदे टोलनाक्यावर आता 10 एप्रिलला सेनेचा राडा

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 12:31AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक-सिन्नर-पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गाव येथील टोलनाक्यावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडूनही टोल आकारणी केला जात असल्याने त्याविरोधातील शिवसेनेचे आंदोलन आता पेट घेणार आहे. यासंदर्भात शिंदे येथे झालेल्या बैठकीत येत्या 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता टोलनाक्यावर तोडफोड आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, टोलसंदर्भात सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचेही बैठकीत ठरले आहे. 

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका होण्यापूर्वीच त्यास स्थानिक नागरिकांसह शिवसेना आणि इतरही सर्वपक्षीयांनी कडाडून विरोध केला होता. त्यावर प्रशासन व शासनाने 20 कि.मी.पर्यंतच्या वाहनांना सवलत व पास देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, त्यानंतर कंपनी व्यवस्थापन व शासनाकडून आंदोलनाची पूर्तता करण्यात आली नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून स्थानिक पंचक्रोशीतील वाहनधारकांकडूनही टोल आकारणी केला जात आहे. स्थानिक नागरिकांना दिवसभरातून अनेकदा ये-जा करावी लागत असते. यामुळे अनेकदा टोल भरावा लागत असल्याने आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

ही बाब आमदार योगेश घोलप यांनी टोल आकारणी करणार्‍या कंपनीच्या निदर्शनास आणून देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही कंपनीने कोणतीही सुधारणा केली नाही. यामुळे गुरुवारी (दि.5) पंचक्रोशीतील गावांचे ग्रामस्थ, वाहतूक शाखेचे पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यात 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ठोस आश्‍वासन दिले जात नाही व त्याची अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे आ. घोलप यांनी बैठकीत सांगितले.  

Tags : Nashik, Nashik, sinnar, Pune, highway, toll plaza, people, Protest,