Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Nashik › मनपाकडून 18 भंगार व्यावसायिकांवर होणार कारवाई

मनपाकडून 18 भंगार व्यावसायिकांवर होणार कारवाई

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:41PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार हटविल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा तिथे अतिक्रमण करणार्‍या 18 व्यावसायिकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे पत्र मनपाच्या भरारी पथकाने सातपूर व अंबड पोलीस ठाण्याला दिले आहे. त्याचबरोबर बांधकाम परवानगीनुसार बांधकाम न करणार्‍या एकास अंतिम नोटीस बजावण्यात आली असून, अन्य एका भंगार व्यावसायिकाची परवानगीच रद्द करण्यात आली आहे. मनपा नगररचना विभागाने आजवर 73 व्यावसायिकांना बांधकामास परवानगी दिली आहे. 

मनपा आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या गेल्या वर्षी जानेवारीत आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अनधिकृत भंगार बाजार हटविण्यात आला होता. त्यात जवळपास 874 हून अधिक अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली होती. नगरसेवक तथा या प्रकरणातील याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात भंगार बाजाराविषयीची स्थिती निदर्शनास आणून दिली होती. मनपाकडून अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही होत असताना मनपा हद्दीत पुन्हा अन्य कुठेही शहरात अनधिकृत भंगार बाजाराची दुकाने थाटली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना मनपा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सातपूर-अंबड लिंकरोडवर अनेक व्यावसायिकांनी पुन्हा भंगार दुकाने थाटण्याची सुरूवात केली आहे. या भंगार बाजाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मनपा अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांचे संयुक्त भरारी पथक स्थापन करण्यात आले होते.

या भरारी पथकाकडूनही योग्य अशी कामगिरी न झाल्याने मध्यंतरी आयुक्तांनी पथकाला कारवाई करण्याबाबत निक्षून सांगितले होते. त्यानुसार या पथकाचे प्रमुख तथा नगररचना विभागाचे अधीक्षक सुशील शिंदे यांनी सातपूर व अंबड पोलीस ठाण्याला पत्र सादर करून भंगार व्यावसायिकावर कारवाई करण्याबाबत सांगितले आहे.