होमपेज › Nashik › नाशिक : पोलीस उपनिरीक्षकास बलात्कार प्रकरणी सक्‍तमजुरी

नाशिक : पोलीस उपनिरीक्षकास बलात्कार प्रकरणी सक्‍तमजुरी

Published On: Jun 27 2018 12:18AM | Last Updated: Jun 27 2018 12:18AMनाशिक : प्रतिनिधी

विवाहाचे आमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध ठेवून शारीरिक अत्याचार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पंकज सुरेश काटे (रा. पंडितनगर, सिडको) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. काटे हा पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहे. 2007 ते 2011 या कालावधीत हा गुन्हा घडला होता. 

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत असताना काटे यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील एका महिला कर्मचार्‍यासोबत काटेने प्रेमसंबंध केले. त्या तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून 2007 ते 2011 या कालावधीत काटेने तरुणीवर नाशिकसह,पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारिरीक अत्याचार केले. पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर मात्र, आरोपी काटे याने विवाह करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित तरुणीने अंबड पोलीस ठाण्यात 2012 मध्ये  काटे विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्‍तहेमराजसिंह राजपूत तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पीडितेसह तिची सहकर्मचारी मैत्रीण, हॉटेलचा व्यवस्थापक, डॉक्टर व राजपूत अशा पाच जणांची साक्ष घेतली. यामध्ये पीडितेची मैत्रीण ही फितूर झाली.  मात्र, सरकारी वकिलांनी साक्षीदारांचे जबाब तसेच, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडून काटेविरोधात सबळ पुरावे सादर केले. त्यानुसार न्यायाधीश घोडके यांनी आरोपी पंकज काटे यास बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, नागरी हक्क संरक्षण अधिनियम कलम (7)अन्वये सहा महिने कारावास व 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. 25 हजार 500 रुपये दंडापैकी 20 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.