होमपेज › Nashik › अमृत शहरांच्या यादीत नाशिक 63 व्या स्थानी

अमृत शहरांच्या यादीत नाशिक 63 व्या स्थानी

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 23 2018 11:47PMनाशिक : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणांंतर्गत नाशिकने मागील वर्षाच्या 151 व्या स्थानावरून यंदा 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडीद्वारे कचरा संकलन, वैयक्‍तिक शौचालये, स्वच्छता मोहीम या काही प्रमुख बाबी सर्वेक्षणात महत्त्वपूर्ण ठरल्या. 

केंद्र शासनाने गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील काही प्रमुख शहरांची निवड करून स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली आहे. शहरांचा दर्जा वाढावा आणि गुणवत्तापूर्ण सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षणात नाशिक शहराचा 500 अमृत शहरांमधून 151 वा क्रमांक आला होता. यामुळे नाशिक मनपाची मोठी निराशा झाली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेत त्यावर कार्यवाही सुरू केली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण पथकाने चार ते पाच दिवस शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसेच शहरातील काही नागरिकांशी चर्चा केली होती. त्या बाबतचा निकाल शनिवारी (दि.23) जाहीर झाला. त्यात नाशिक मनपाने मागील वर्षाच्या 151 व्या क्रमांकावरून 63 व्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. 500 अमृत शहरांतून नाशिकची ही निवड झाली आहे. चार हजार गुणांपैकी 2786 इतके गुण नाशिक शहराला मिळाले आहे. कचरा डेपोतून दररोज येणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करणे, वीजनिर्मिती, इंधननिर्मिती, दररोज घंटागाड्यांद्वारे कचर्‍याचे संकलन, गोदावरी प्रदूषणमुक्‍तीसाठी उपाययोजना, ठिकठिकाणी डस्टबिन बसविणे, शहरातील भाजीबाजार, बसस्थानके, रेल्वेस्थानकांची स्वच्छता, शाळा व क्रीडांगणांसह उद्यानांमधील स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता यासह विविध बाबींचा विचार स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत झाला आहे.