Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Nashik › रिक्त जागा अडीच हजार, निवडले अवघे सातशे!

रिक्त जागा अडीच हजार, निवडले अवघे सातशे!

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:34PM

बुकमार्क करा
नाशिक : धनराज गायकवाड

पुणे महानगर परिवहन महामंडळाने अडीच हजार रिक्त पदांसाठी काढलेल्या जाहिरातीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यातील सुमारे नऊ हजार उमेदवारांनी अर्ज भरले.  कागदपत्रे तपासणीत पात्र ठरलेल्या तीन हजार उमेदवारांची शारीरिक चाचणीही घेण्यात आली. मात्र, या जागा भरताना केवळ 698 उमेदवारांचीच निवड करण्यात आल्याने उर्वरित जागा का भरल्या गेल्या नाहीत, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल वर्षभरापासून सुरू असलेली ही निवडप्रक्रियाच आता संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. तथापि, याप्रकरणी परिवहन अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ‘उमेदवार पात्रच ठरले नाहीत’, असे मोघम उत्तर उमेदवारांना दिले जात आहे.

पुणे परिवहन महामंडळाने वर्षभरापूर्वी (जानेवारी 2017) बदली चालक पदाच्या तब्बल 2440 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. जाहिरातीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या पदासाठी राज्यभरातील तब्बल 8,766 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून कागदपत्रे तपासणीनंतर तीन हजारांहून अधिक उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी (वजन, उंची) बोलावण्यात आले. या चाचणीत पात्र ठरलेल्या 2329 इतक्या उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलावण्यात आले. 17 डिसेंबर 2017 ला ड्रायव्हिंग टेस्ट पूर्ण झाली. त्यानंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल, असे एका जाहिरातीद्वारे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात निवड करताना अवघ्या 698 उमेदवारांचीच निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या बेरोजगार युवकांचा हिरमोड झाला आहे. याबाबत परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला असता या पदासाठी उमेदवार पात्रच ठरले नाहीत, असे अजब उत्तर देण्यात आले आहे. जाहिरातीत रिक्त पदांची संख्या 2440 आहे. तसेच, आठ हजारांच्या वर उमेदवारांनी अर्ज केलेलेे असताना केवळ  2329 उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलावणे, त्यापैकी अवघ्या 698 पात्र उमेदवारांचीच निवड करणे या सगळ्या प्रकाराबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जाहिरातीमध्ये अंतिम निकालाआधारे गुणवत्ताक्रमाप्रमाणे उपलब्ध पदांच्या संख्येइतक्या उमेदवारांची निवड करण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मात्र, निवड यादीमध्ये केवळ 698 इतक्याच उमेदवारांचा समावेश केल्याने अन्य उमेदवारांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच, जर परिवहन मंडळाला 2440 रिक्त जागा भरावयाच्या नव्हत्या तर इतक्या जागांसाठी जाहिरात का दिली, असा सवाल उपस्थित केला  जात आहे.