होमपेज › Nashik › वाढीव ‘समृद्धी’साठी रातोरात विहीर खोदली

वाढीव ‘समृद्धी’साठी रातोरात विहीर खोदली

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:44PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

समृद्धी प्रकल्पात वाढीव मोबदल्यासाठी रातोरात पोल्ट्री फार्म, पाइपलाइन तसेच, विहिरी खोदणार्‍यांना भरपाईसाठी एकही वाढीव पैसा दिला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी अशा घटनांमधील संबंधितांना दोषी धरत वेळप्रसंगी कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आजमितीस 38 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे.मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पामध्ये सरकार थेट वाटाघाटीद्वारे शेतकर्‍यांकडून जमीन अधिग्रहीत करत आहेत. यामध्ये जमिनीच्या मोबदल्यासह जमिनीतील विहिरी तसेच इतर बाबींसाठी भरपाई दिली जात आहे.

याचाच गैरफायदा घेत सिन्नर तालुक्यातील काही गावांमधील शेतकर्‍यांनी जादाच्या लाभासाठी जमिनीत रातोरात पोल्ट्रीफार्म तसेच पाइपलाइन वृक्ष लागवड, विहीर खोदणे तसेच, पाइपलाइन टाकण्याचे प्रकार प्रशासनाच्या पाहणीत उघड झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील समृद्धी प्रकल्पग्रस्त गावांचा 2015 पासूनचे रेकॉर्ड प्रशासनाकडे उपलब्ध आहे. तसेच, संयुक्त मोजणीपूर्वीचे प्रत्येक गटाचे छायाचित्र देखील घेण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव मोबदल्यासाठी जर कोणी जमिनीत बदल करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकल्पबाधितांवर वेळप्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यातून समृद्धी प्रकल्प 105 किलोमीटरचा असून, त्यासाठी 1200 हेक्टर जमीन अधिग्रहण करायचे आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे आणि घोरवड वगळता सर्व ठिकाणची संयुक्त मोजणीचे काम पुर्ण झाले आहे. आजमितीस एकुण क्षेत्रापैकी 450 हेक्टर म्हणजेच 38 टक्के क्षेत्राचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. प्रकल्पाला जमीन देण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये एकूण क्षेत्राच्या पन्नास टक्के क्षेत्र अधिग्रहण पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहरातून घोटीपर्यंत समृद्धीसाठी कनेक्टर देण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.