Mon, Jun 17, 2019 11:14होमपेज › Nashik › वाहनतळांच्या जागा बिल्डरांच्या घशात

वाहनतळांच्या जागा बिल्डरांच्या घशात

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:24PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मनपातील मिळकत आणि नगररचना विभागातील काही अधिकार्‍यांनी शहर विकास आराखड्यातील वाहनतळांच्या अनेक जागा बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत. 28 वाहनतळांच्या जागेपैकी पाच जागा समावेश आरक्षणांंतर्गत (अ‍ॅकॉमोडेशन रिझर्व्हेशन) विकसित करण्यासाठी बिल्डरांना दिल्या. या जागांवर इमारती उभ्या राहिल्या. परंतु, त्यावरील वाहनतळ केवळ कागदोपत्री मनपाच्या ताब्यात आल्याचे दर्शवून वाहनतळांची जागाही गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शहरातील सार्वजनिक वाहतुकीची कोंडी, पार्किंगसाठी नसलेली जागा आणि त्यामुळे ऐन रस्त्याच्या कडेलाच लागणारी वाहने अशी स्थिती शहराची झाली आहे. असे असताना गेल्या 25 ते 30 वर्षांपासून विकास आराखड्यात आरक्षणे असलेल्या वाहनतळांच्या जागा ताब्यात घेणे गरजेचे असताना त्या घेतल्या गेल्या नाहीत. तसेच नको असलेली आरक्षणे ताब्यात घेऊन त्यावर उधळपट्टी करण्यात आली. हा प्रकार होत असतानाच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या काही आरक्षणांच्या जागा  अधिकार्‍यांनी बिल्डरांशी संगनमत करून ‘एआर’खाली विकसित करण्यासाठी देऊन घशात घातल्या आहेत. त्यात कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका, इंद्रकुंड व सीतागुंफासमोरील तसेच देवळालीतील जागांचा समावेश आहे.   वाहनतळाच्या 18 जागांविषयी प्रशासन बोलायलाही राजी नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.